माझ्या अटकेसाठी एका पोलीस आयुक्तांना सुपारी देण्यात आली होती; पुण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट

भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ फडणवीस पुण्यामध्ये आले आहेत. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधत भाजपचे पुण्याच्या विकासाचे व्हिजन सांगितले आहे.

  पुणे : लोकसभा मतदारसंघाच्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांची पुण्यामध्ये सभा आहे. पुणे लोकसभा मतदारसंघाचा आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यामुळे जोरदार प्रचार केला जात आहे. भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील पुण्यामध्ये हजर आहेत. भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ फडणवीस पुण्यामध्ये आले आहेत. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधत भाजपचे पुण्याच्या विकासाचे व्हिजन सांगितले आहे.

  पुणे हे आता ग्रोथ इंजिन

  माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुण्याच्या विकासामध्ये एक व्हिजन ठेऊन आम्ही काम केलं. स्वारगेटला होणारे मल्टीमीडिया हब हे त्यातील एक उदाहरण आहे. मुंबई जसं महत्त्वाचं शहर आहे तसंच आता पुणे होत आहे. पुणे हे आता ग्रोथ इंजिन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्याला मेट्रो दिली. पुण्यातील सर्व प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर देशातील एक महत्त्वपूर्ण शहर असेल असे मत देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील भाजपची विकासकामं सांगताना मांडले.

  त्यांना दाखवण्यासारखा एकही प्रकल्प नाही

  पुढे ते म्हणाले, “मी भाषणामध्ये 90 टक्के काय केलं आणि काय करणार याबाबत बोलतो. विकासकामांबाबत बोलतो. फक्त 10 टक्के राजकाणाचं बोलतो. पण आमच्या विरोधकांच्या भाषणांमध्ये 1 टक्काही विकासाबाबत बोललं जात नाही. शेवटी निवडणूक ही गद्दार अन् खुद्दार वर लढवता येत नाही. जेव्हा ते आमच्या विकासाशी तुलना करायला जातात तेव्हा त्यांच्याकडे काहीही राहत नाही. त्यांना दाखवण्यासारखा एकही प्रकल्प त्यांच्याकडे नाही. त्यामुळे हे विकासावर आणि पंतप्रधान मोदींवर बोलत नाहीत. त्यामुळे ते अशाप्रकारे नरेटीव्ह मांडण्याचा प्रयत्न करत आहेत.” असे मत देवेंद्र फडणवीस यांनी मांडले.

  माझ्या अटकेसाठी एका पोलीस आयुक्तांना सुपारी देण्यात आली

  ‘अरविंद केजरीवाल हे काही महान कार्य करुन बाहेर आलेले नाहीत त्यामुळे ते कशाचा सत्कार करत आहेत माहिती नाही’ अशी टिप्पणी देखील फडणवीसांनी केली. फडणवीस यांनी पुढे त्यांच्या अटकेबाबत गौप्यस्फोट देखील केला. देवेंद्र फडणवीस म्हणाले, “माझ्या अटकेसाठी एका पोलीस आयुक्तांना सुपारी देण्यात आली. केसापासून नखांपर्यंत माझी चौकशी करण्यात आली.पण मी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की मी जेव्हा मी एवढी सरकारविरोधात भूमिका घेतो तेव्हा मी काचेच्या घरात राहत नाही. त्यांनी खोट्या केसेस करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना काहीही पुरावा मिळाला नाही. पोलिसांनी देखील पुढे सांगितलं आम्ही हे करणार नाही.” असा गौप्यस्फोट केला.

  फडणवीस यांनी कॉंग्रेसवर देखील निशाणा साधला. केंद्रापासून राज्यापर्यंत सक्षम विरोधीपक्ष नसल्याबद्दल विचारल्यानंतर फडणवीस म्हणाले, “लोकशाहीमध्ये कोणी कोणाला संपवत नसतो. कॉंग्रेस आपल्या कर्माने खाली गेलं आहे. कारण कॉंग्रेसला हे माहिती होत की आपल्या नेत्यामध्ये सक्षमता नाहीये तरी त्याच नेत्याला 17 वेळा पुढं आणलं आणि त्याचं लॉन्च फेल गेलं. उलट आमचं हे मत आहे की देशामध्ये सक्षम विरोधी पक्ष असावा. आम्ही विरोधात होतो तेव्हा आम्ही अभ्यासू विरोधीपद सांभाळलं,” असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.