
पुणे : पुण्यातील लोहगाव परिसरात तरुण दाम्पत्याचे मृतदेह राहत्या घरात आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आज सकाळी हा प्रकार उघड झाला असून, त्यांनी घराला आतून दरवाजा लावून टोकाचे पाऊल उचलले आहे. दरम्यान, त्यांनी आत्महत्या का केली हे समजू शकलेले नाही.
किरण महादेव बोबडे (वय २३) आरती किरण बोबडे (वय २३) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
शनिवारपासून होता दरवाजा बंद
मिळालेल्या माहितीनुसार, बोबडे दाम्पत्य वडगाव शिंदे रोडवरील लेक व्ह्यू सिटी येथे राहत होते. आज सकाळी घरातून दुर्गंधी येत होती. नागरिकांनी याची माहिती विमानतळ पोलिसांना देण्यात आली. लागलीच पोलिसांनी येथे धाव घेत दरवाजा तोडून पाहणी केली. किरण याने गळफास घेतल्याचे व पत्नी ही बेडवर मृतावस्थेत आढळून आली. शनिवारपासून त्यांचा दरवाजा बंद होता. मृतदेह सडलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे त्यांनी दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली असावी असा अंदाज आहे.
किरण पोस्टात नोकरी करीत होता. तर आरती एका बँकेत नोकरी करीत होती. काहीच महिन्यांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. पाच महिन्यांपासून ते याठिकाणी भाड्याने राहत होते.