औदुंबरमध्ये आढळली मृत मगर, चार फूट लांब; शवविच्छेदनाच्या अहवालाची प्रतीक्षा

औदुंबर (ता. पलूस) येथील श्री दत्त मंदिर परिसरात सकाळी मृत मगर आढळून आली. आढळलेली मृत मगर सुमारे साडेचार फूटाची होती. येथील परिसर मासेमारीसाठी आहे. त्यामुळे या औदुंबर डोहाच्या नैसर्गिक मुक्त अधिवासात दुपारच्या वेळी मगरीचा मुक्त संचार पाहायला मिळतो.

  सांगली : औदुंबर (ता. पलूस) येथील श्री दत्त मंदिर परिसरात सकाळी मृत मगर आढळून आली. आढळलेली मृत मगर सुमारे साडेचार फूटाची होती. येथील परिसर मासेमारीसाठी आहे. त्यामुळे या औदुंबर डोहाच्या नैसर्गिक मुक्त अधिवासात दुपारच्या वेळी मगरीचा मुक्त संचार पाहायला मिळतो. येथील नावाडी नितीन गुरव यांना वाहत जाणारी ही मगर आढळताच त्यांनी भिलवडी पोलीस ठाणे व वन विभागास माहिती दिली. तत्काळ वनविभागाचे सांगलीचे सहाय्यक वनसंरक्षक डॉ. अजित साजणे, मानद वन्यजीव रक्षक अजितकुमार पाटील घटनास्थळी दाखल झाले.

  पलूस कडेगावच्या पल्लवी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल मारुती ढेरे, वनरक्षक सुरेखा लोहार, वनमजूर लालासो दुबिले यांनी मृत मगरीला बाहेर काढले. ४ फूट लांबीची मादी मगर कृष्णा नदीत औदुंबर इथे मृतावस्थेत आढळली. भाविकांनी ही मगर वाहत जात असताना पहिली व त्याची माहिती वन विभागास दिली. बोटीच्या साह्याने मगर नदी काठावर आणून तिचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनाचा अहवाल अजून आलेला नाही.

  शरिरावर हल्ल्याच्या खुणा नाहीत

  उलट बाजूने तरंगणारी मगर सडलेल्या अवस्थेत होती. तिच्या शरिरावर कोठेही हल्ला झालेल्या खुणा आढळल्या नाहीत. माळवाडी येथील पशूधन विकास अधिकारी सायली तगरे यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करुन तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पुढील तपास चालू असल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले.

  वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बोटीतून पाहणी करून मगरीच्या मृत्यूबाबत काही पुरावे मिळतात का याचा शोध घेतला. बोट चालक नंदू गुरव यांच्याकडून अवदुंबुर परिसरातील नदी पत्रात अस्तित्वात असणाऱ्या मगरीबाबत माहिती अवगत करून घेतली.

  - अजितकुमार पाटील, मानद सचिव, वन विभाग