नांदेडमध्ये मृत्यूचे थैमान सुरूच! शासकीय रुग्णालयात आणखी ७ रुग्णांचा मृत्यू, मृतात ४ नवजात

नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू झाला होता. यानंतर आज पुन्हा सात जणांचा मृत्यू झाला आहे. आजच्या मृतांमध्ये ४ बालकांचा समावेश आहे, अशी माहिती काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी दिली आहे. 

    नांदेड : नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू झाला होता. यानंतर आज पुन्हा सात जणांचा मृत्यू झाला आहे. आजच्या मृतांमध्ये ४ बालकांचा समावेश आहे, अशी माहिती काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

    ट्वीट करत चव्हाण यांनी सांगितलं की, नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात कालपासून आणखी ७ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतकांमध्ये ४ बालकांचाही समावेश आहे. राज्य सरकारनं या रुग्णालयातील मृत्यूंची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

    दरम्यान, आज मंगळवारी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, पालक मंत्री गिरीश महाजन, वैद्यकीय शिक्षण संचालक दिलीप म्हेसेकर नांदेडला येऊन रुग्णालयाची पाहणी करणार असल्याने संबंधितांचे धाबे दणाणले आहेत.

    चौकशी समिती आज नांदेडमध्ये

    सदर घडलेल्या प्रकारानंतर चौकशी समिती आज नांदेडमध्ये येणार आहे. शासकीय रुग्णालयात २४ तासांत २४ रुग्णांचे मृत्यू झाल्याच्या प्रकरणाची शासनाने गंभीर दखल घेतली असून मंगळवारी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयातील डॉ. भारत चव्हाण, डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य आणि बालरोग तज्ज्ञ डॉ. जोशी या तिघांची चौकशी समिती नांदेडात येणार आहे.