राज्यात पाय पसरतोय कोरोना! छत्रपती संभाजीनगरमध्ये कोरोनाची लागण झालेल्या 65 वर्षीय महिलेचा मृत्यू

गेल्या काही दिवसारपासून देशात कोरोनानं (Corona) पुन्हा डोकं वर काढलं आहे. राज्यातही कोरोनानं पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. मुंबईसह राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळताना दिसत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar District) कोरोनाची (Corona ) लागण झालेल्या 65 वर्षीय महिलेचा मृत्यू (Death) झाला आहे. मृत महिलेवर 16 मार्चपासून शासकीय घाटीत उपचार सुरु होते. शहरात चार महिन्यानंतर कोरोनामुळे झालेला हा पहिलाच मृत्यू आहे.

चार महिन्यानंतर शहरात कोरोनामुळे पहिलाच मृत्यू

संपुर्ण राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळत असताना छत्रपती संभाजीनगरमध्येही कोरोनाही वाढत आहे. शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण गेल्या काही दिवसात सतत वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. दरम्यान क्षयरोग असलेल्या सुंदरवाडी येथील 65 वर्षीय महिलेला घाटीत दाखल केल्यानंतर त्यांना न्यूमोनिया झाला. त्यानंतर फुफ्फुसातही जंतुसंसर्ग झाला आणि त्याचा हृदयावरही परिणाम झाला. या महिलेला आधी थायरॉइडचा देखील त्रास होता. तसेच कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. दरम्यान उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला आहे.

शुक्रवारी आणखी 10 जण आढळले कोरोना  पॉझिटिव्ह

गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर शहरात कोरोनाचा आकडा सतत वाढताना पाहायला मिळत आहे. तर आधीच शहरात एन्फ्लुएंझा एच-3, एन-2 व्हायरसचा धोका असताना कोरोनाने देखील चिंता वाढता. दरम्यान शुक्रवारी (24 मार्च रोजी) आणखी 10 नवीन रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे सध्या 41 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.