पाण्याच्या टाकीत बुडून दीड वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू; घरासमोरील अंगणात खेळताना घडली घटना

तालुक्यातील जंगलव्याप्त आदिवासी बहुल राजापूर गावात घरासमोरील पाण्याच्या टाक्यात बुडून दीड वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू (A Child Died) झाल्याची हृदयद्रावक घटना गुरूवारी सकाळी घडली. अद्विक अतुल शहारे (14 महिने) असे मृत पावलेल्या बाळाचे नाव आहे.

    तुमसर : तालुक्यातील जंगलव्याप्त आदिवासी बहुल राजापूर गावात घरासमोरील पाण्याच्या टाक्यात बुडून दीड वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू (A Child Died) झाल्याची हृदयद्रावक घटना गुरूवारी सकाळी घडली. अद्विक अतुल शहारे (14 महिने) असे मृत पावलेल्या बाळाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच गोबरवाही पोलिसांनी राजापूर गाठले. नाकातोंडात पाणी जाऊन श्वास गुदमरून बालकाचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी मौका पंचनाम्यात नमूद केला आहे.

    घरासमोरील अंगणात खेळताना अद्विक रांगत रांगत पाण्याने भरलेल्या टाक्याजवळ गेला. तोल गेल्याने बुडून त्याचा मृत्यू झाला. यावेळी कुणीही आसपास नसल्याने हा प्रकार लक्षात आला नाही. मात्र, बराच वेळ अद्विक न दिसल्याने टाक्याकडे जाऊन पाहिले असता, तो बेशुद्धवस्थेत दिसून आला. त्याला बाहेर काढून प्राथमिक उपाय करण्यात आले. परंतु, त्याने प्रतिसाद दिला नाही. लगेच पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.

    समांतर टाक्याने घेतले प्राण

    ग्रामीण भागात आजही पाणी साठवून ठेवण्यासाठी सिमेंटचे टाके तयार करण्याची प्रथा आहे. जमिनीला समांतर असणाऱ्या टाक्यात पडून बालकाचा मृत्यू झाला. चिमुकल्याच्या दुर्देवी मृत्युमुळे शहारे कुटुंबावर मोठा आघात झाला असून गावात शोककळा पसरली आहे.