गाईंच्या मृत्यूने गोठ्यांना अवकळा; लम्पी स्कीन पुढे पशुपालक हतबल

गेल्या महिनाभरापासून जनावरांना लम्पी स्किन या रोगांनी ग्रासले आहे. लाखो रुपयांच्या गाई डोळ्यादेखत प्राण सोडत आहे. लम्पी स्कीनच्या प्रादुर्भावाने रुबाबदार गाईंच्या वास्तव्याने वैभव दाखवणारे गोठे आता अवकळा अनुभवत असल्याचे विदारक चित्र आहे. बहुतांशी गाईंच्या गोठ्यांमध्ये लम्पीने थैमान मांडले आहे.

  रांजणी : गेल्या महिनाभरापासून जनावरांना लम्पी स्किन या रोगांनी ग्रासले आहे. लाखो रुपयांच्या गाई डोळ्यादेखत प्राण सोडत आहे. लम्पी स्कीनच्या प्रादुर्भावाने रुबाबदार गाईंच्या वास्तव्याने वैभव दाखवणारे गोठे आता अवकळा अनुभवत असल्याचे विदारक चित्र आहे. बहुतांशी गाईंच्या गोठ्यांमध्ये लम्पीने थैमान मांडले आहे.

  पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

  दरम्यान,  उत्कृष्ट व्यवस्थापनाने ज्या गोठा मालकांनी मरतूक टाळली ते गोठा व्यावसायिक या आजारापुढे हतबल झाले आहेत. कागदी घोडे नाचवणाऱ्या पशुसंवर्धन विभागाला मात्र याचा अद्यापही काही अंशी गंध नसल्याचे वेदनादायी चित्र दिसून येते.  काही ठिकाणी वारंवार दूरध्वनी करून सुद्धा पशुवैद्यकीय अधिकारी गोठ्यात येत नसल्याच्या भावना गोठा मालकांनी व्यक्त केल्या.

  पुणे जिल्ह्यात लम्पी स्कीनच्या आजाराने सुमारे २१  जनावरे दगावली आहेत. लंम्पीच्या प्रादुर्भावाने गाईंबरोबरच इतर जनावरांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे. गेल्या महिनाभरापासून लम्पी स्किनचा प्रादुर्भाव जिल्ह्यात फैलावला असून, या रोगाला आळा घालण्यासाठी पशुसंवर्धन खाते आणि आरोग्य विभाग पुढे सरसावला आहे. दरम्यान ज्यावेळी लसी हव्या होत्या, त्यावेळी त्या वेळेत उपलब्ध झाल्या नसल्याच्या तक्रारी देखील शेतकऱ्यांनी केल्या आहेत.

  दूध उत्पादनात घट

  सध्या दुग्ध व्यवसायाच्या बळावर अनेक शेतकऱ्यांनी आपला चरितार्थ चालवला आहे. परंतु लाखो रुपयांची जनावरे लंम्पी स्कीनच्या तडाख्यात सापडल्याने सामान्य दूध उत्पादक शेतकरी हादरून गेला आहे. हा आजार आटोक्यात येत नसल्याने दुधाच्या उत्पादनात देखील घट होत चालली आहे. जनावरांचा मृत्यू झाला नाही तरी आजाराचा प्रादुर्भाव मात्र वाढत आहे. त्यामुळे दुधाच्या उत्पादनात घट होत असल्याचे चित्र दिसून येते. विशेष करून प्रत्येक पशुपालकांच्या गाईंमध्ये लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव होत आहे आणि त्याचाच फटका दूध उत्पादनाला बसला आहे.

  आम्ही सातत्याने मागणी केल्याने पशुवैद्यकीय विभागाला जाग आली. लंम्पी स्कीन प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी लस उपलब्ध करून दिली. त्यामुळे लंम्पी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यास काही अंशी मदत झाली.

  --महेश जाधव, शेतकरी, रांजणी