drowning

हिवरखेडनजीक येत असलेल्या अकोला-बुलडाणा या दोन जिल्ह्याच्या सीमारेषेवरील वारी भैरवगड येथील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळावरील हनुमान मंदिरालगतच्या आड नदी पात्रातील राजण्या डोहात एका तरुणाचा बूडून मृत्यू झाला.

    हिवरखेड : हिवरखेडनजीक येत असलेल्या अकोला-बुलडाणा या दोन जिल्ह्याच्या सीमारेषेवरील वारी भैरवगड येथील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळावरील हनुमान मंदिरालगतच्या आड नदी पात्रातील राजण्या डोहात (Rajnya Doha) एका तरुणाचा बूडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना सोनाळा पोलिस ठाणे हद्दीत शुक्रवारी दुपारी घडली.

    आदित्य मेहरे (21) असे डोहात बुडून मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे. तो अकोला जिल्ह्यातील सस्ती वाडेगाव येथील रहिवासी आहे. घटनेची माहिती प्राप्त होताच सोनाळा ठाण्यातील मोईनोद्दीन सैय्यद यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. दुपारपासून डोहात बुडालेल्या तरुणाला शोधण्यासाठी शोध मोहीम राबविण्यात आली. सायंकाळी तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. अकोला, बुलडाणा या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेल्या वारी भैरवगड येथे पुरातन हनुमान मंदिर आहे, हनुमानाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात येथे भाविकांची रेलचेल असते.

    सातपुडा पर्वत रांगेत निसर्गरम्य वातावरण तसेच तीन नद्यांचा संगम असल्याने या जागेला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. वान नदी व आड नदी पात्रातील डोह हे मृत्यूचे सापळे बनल्याने या डोहांमध्ये बुडून मरण पावणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान सायंकाळी तरुणाच्या मृतदेहाला शवविच्छेदनासाठी वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.