झाई शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा मृत्यू, बातमीने उडाली खळबळ

झाई शासकीय आश्रमशाळेत एक दु:खद घटना घडली आहे. या आश्रमशाळेमध्ये चौथीमध्ये शिकणाऱ्या सरिता निमला (९) (Sarika Nimla) या विद्यार्थिनीचा आज (शनिवार) मृत्यू  (Death of Ashram School Student) झाला आहे.

    पालघर : तलासरी तालुक्यातील झाई शासकीय आश्रमशाळेत एक दु:खद घटना घडली आहे. या आश्रमशाळेमध्ये चौथीमध्ये शिकणाऱ्या सरिता निमला (९) (Sarika Nimla) या विद्यार्थिनीचा आज (शनिवार) मृत्यू (Death of Ashram School Student) झाला आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या डहाणू कार्यालया अंतर्गत ही निवासी शाळा आहे.

    सरिता या विद्यार्थिनीला डोकेदुखीचा त्रास होत होता. त्यानंतर तिला देहरी हॉस्पिटल येथे तपासणी करून औषधे देण्यात आली होती. त्यानंतर आज सकाळी ती बेशुद्ध पडली. तिला आता घोलवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. प्रकृती बिघडल्याने तिला डहाणू कुटीर रुग्णालयात (Dahanu Hospital) नेण्यास सांगण्यात आले. मात्र डहाणू रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी तिला मृत घोषित करण्यात आले.

    मिळालेल्या माहितीनुसार, या विद्यार्थिनीसोबत अन्य काही विद्यार्थ्यांची तपासणी काल करण्यात आली आहे. या शाळेतील अन्य विद्यार्थ्यांना ताप, सर्दी-खोकला, अंगदुखी ही लक्षणे आढळली आहेत.

    सकाळची न्याहरी केल्यानंतर सरिताची प्रकृती खालावली. शाळा प्रशासन तिला रुग्णालयात घेऊन जात असताना तिचा मृत्यू झाला. डहाणूच्या आगर येथील उप जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल अशी माहिती प्रकल्प अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली.