छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मृत्यूचे तांडव; अहवाल 25 ऑगस्ट पर्यंत सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये घडलेल्या दुःखद प्रकरणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयास भेट दिली. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी शासनाच्या वतीने 9 सदस्यीय समिती गठीत करण्यात आली असून, 25 ऑगस्ट 2023 पर्यंत वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

  ठाणे : कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये घडलेल्या दुःखद प्रकरणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयास भेट दिली. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी शासनाच्या वतीने 9 सदस्यीय समिती गठीत करण्यात आली असून, 25 ऑगस्ट 2023 पर्यंत वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

  अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल,असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केले. त्याचबरोबर रुग्णांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी – कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण होवू न देता त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी सर्वांनी जबाबदारी घेण्याचेही आवाहन त्यांनी केले.

  कळवा येथील ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात शनिवार व रविवार या दोन्ही दिवशी मिळून 18 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या आज रुग्णालयास भेट देऊन झालेल्या मृत्यूबाबतची माहिती घेतली.

  यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, रुग्णालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. राकेश बारोट, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार, अति. आयुक्त संदीप माळवी आदी उपस्थित होते.

  छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ज्या दिवशी १८ जणांचा मृत्यू झाला त्या दिवशी ९१ रूग्ण दाखल झाले तर २२ जणांवर शस्त्रक्रिया झाल्या, त्यामुळे रूग्णालयावर तसेच येथे होणाऱ्या उपचारांवर नागरिकांचा विश्वास असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. सिव्हिल रुग्णालय सद्य:स्थितीत मनोरूग्णालय येथे सुरू असून तिथे ३०० खाटा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. रूग्णांच्या सोईसाठी दोन्ही ठिकाणी रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. रुग्ण दगावल्याची घटना दुर्दैवी असून या घटनेच्या चौकशीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले.

  तत्पूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांनी संपूर्ण प्रकरणाबाबत संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले की, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय या दोन्ही ठिकाणांहून रुग्णांच्या सोयीसाठी मोफत रुग्णवाहिका सेवा तात्काळ सुरू करावी, अतिदक्षता विभागातील बेडस् ची संख्या वाढवावी, त्यासाठी आवश्यक वैद्यकीय अधिकारी- कर्मचाऱ्यांची तात्काळ भरती करावी. रुग्णांच्या उपचारांसाठी ज्या काही अत्यावश्यक सेवा कार्यान्वित करावयाच्या असतील त्या तात्काळ कराव्यात. निधीची कमतरता भासू देणार नाही, असेही त्यांनी शेवटी सांगितले.