राजेश्वर माऊली सरकार यांना जीवे मारण्याची धमकी, भक्तांमध्ये खळबळ; कुन्हा ठाण्यात गुन्हा दाखल

राजराजेश्वराचार्य महाराज माऊली सरकार (पिठाधिश्वर रूक्मिणी पिठ, अंबिकापूर, कौंडण्यपूर) यांना जीवे मारण्याची धमकीची चिठ्ठी मिळाली. अशाप्रकारे चिठ्ठी मिळाल्याने त्यांच्या भक्तांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

    अमरावती : राजराजेश्वराचार्य महाराज माऊली सरकार (पिठाधिश्वर रूक्मिणी पिठ, अंबिकापूर, कौंडण्यपूर) यांना जीवे मारण्याची धमकीची चिठ्ठी मिळाली. अशाप्रकारे चिठ्ठी मिळाल्याने त्यांच्या भक्तांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. या घटनेची तक्रार कुन्हा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुध्द अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.

    धमकी देणाऱ्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी घेऊन राजेश्वर माऊली यांच्या भक्तमंडळींनी पोलिस अधीक्षक कार्यालयातसुद्धा निवेदन देण्यात आले. शुक्रवारी (ता.12) राजेश्वर माऊली यांच्या सभा मंडळ परिसरातील दाराच्या कडीवर एक निनावी चिठ्ठी दिसून आली. त्या चिठ्ठीतून राजेश्वर माऊली यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. याबाबतच्या माहितीवरून कुर्हा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन ती चिठ्ठी जप्त केली. पुढील चौकशी पोलिस करत आहेत.

    कुणीतरी अज्ञाताने चिठ्ठीद्वारे धमकीचे पत्र दिले आहे. देश, धर्म व धार्मिक कार्यात जीव गेला तरी चालेल. परंतु, अशा धमक्यांना भिणार नाही. यासंदर्भात पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.

    – राजेश्वर माऊली, अंबिकापुर, कौंडण्यपूर.