
निवडणुकीच्या तोंडावर हिंदू मुस्लिम दंगली घडविल्या जातील, समाजात फुट आणखी कशी वाढेल हे पाहिले जाईल, त्यामुळे आताच निर्णय घ्या, आपलं मत आजच ठरवा आणि भाजप – आरएसएसची सत्ता उलथवून टाका, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.
अहमदनगर : निवडणुकीच्या तोंडावर हिंदू मुस्लिम दंगली घडविल्या जातील, समाजात फुट आणखी कशी वाढेल हे पाहिले जाईल, त्यामुळे आताच निर्णय घ्या, आपलं मत आजच ठरवा आणि भाजप – आरएसएसची सत्ता उलथवून टाका, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे आयोजित बहुजन अल्पसंख्यांक जनआक्रोश महासभेत ते बोलत होते. यावेळी हारेगाव येथील पीडित युवकांच्या परिवाराला त्यांनी भेट दिली.
वाढत्या जातीयता आणि धर्मांधतेतून सुरू असलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्यावतीने राहुरी येथे बहुजन अल्पसंख्यांक जनआक्रोश महासभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते फारुख अहमद, प्रदेश उपाध्यक्ष किसन चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष दिशा पिंकी शेख, युवा नेते सुजात आंबेडकर, युवा राज्य कार्यकारिणी सदस्य अमित भुईगल, मुस्लिम इत्तेहाद फ्रंटचे जावेद कुरेशी, जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे, तालुका अध्यक्ष संतोष चोलके पाटील,राहुरी शहर अध्यक्ष पिंटू नाना साळवे,अनिल जाधव, निलेश जगधने, अजीजभाई ओहरा, संदीप मोकळं,सुनील ब्राह्मणे,जालिंदर घिगे, कमलभाई शेख, दीपक कसबे, नितीन बनसोडे,चरण दादा त्रिभुवन,मधुकर साळवे, महेश साळवे, हरीश चक्रणारायन, रवींद्र पवार, शरद खरात, आदी उपस्थित होते.
जो आईला सांभाळू शकत नाही, तो मतदारांना काय सांभाळणार?
यावेळी पुढे बोलताना ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ‘मोदींनी आईची देखभाल केली का? की केवळ दर चार महिन्याला भेटून फोटो इवेंट केले? पंतप्रधानाच्या निवासस्थानी आईला का नेलं नाही? जो आईला सांभाळू शकत नाही, तो मतदारांना काय सांभाळणार? अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदासाठी उभा असलेला उमेदवार त्याच्या कुटुंबासोबत कसा वागतो, त्याचे आई, बायको, मुलं यांच्याशी संबंध कसे आहेत हे बघितलं जातं आणि मगच मत दिले जातं.
मोदी स्वतःच्या आईशी प्रामाणिक नाहीत, धर्मपत्नीला सांभाळत नाहीत तो तुमच्याशी काय प्रमाणिक राहील? भाजप आणि आरएसएसच गठबंधनला तुम्ही उलथून टाकू शकता. निवडणुकीत प्रचाराला वेळ मिळेल न मिळेन, पण माझं मत हे भाजपच्या विरोधात, हे पहिल्यांदा ठरवून घ्या. दुसरी कुठलीच चर्चा नाही, फक्त एकच चर्चा आणि ती म्हणजे भाजपला पुन्हा आम्ही केंद्रामध्ये सत्तेमध्ये येऊ देणार नाही हे ठरवून टाका’, असे आवाहन त्यांनी केले.
कॉँग्रेसच्या घोड्याची लगाम ही राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या हातात
इंडिया आघाडीबद्दल बोलताना बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की, ‘काँग्रेसला आम्ही सांगितल आहे की, जशी आम्ही शिवसेने बरोबर जशी युती केली आहे तशी आपल्याबरोबर करायला तयार आहोत. पण कॉँग्रेसचं घोडं कुठ पाणी पितंय हेचं कळायला मार्ग नाही. कॉँग्रेसच्या घोड्याची लगाम ही राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या हातात असल्याचे दिसत आहे.’ अशी टीका त्यांनी केली.
मराठा आरक्षण भाजपने काढून घेतलं
मराठा अरक्षणबद्दल बोलताना ते म्हणाले की, ‘इथला गरीब मराठा या देशातला एक हिस्सा आहे. गरीब आहे त्याला श्रीमंत मराठा हा बघायला तयार नाही. उमेदवारी द्यायला तयार नाही, ग्रामपंचायती मध्ये सुद्धा उभा करायला तयार नाही. गरीब मराठा समाजाला आरक्षणाच्या माध्यमातून जो फायदा होणार होता, त्याचं ताट जर कोणी काढल असेल तर ते भाजपने काढलय हे आपण लक्षात घ्या. आता श्रीमंत मराठा तोंड देखलं लढण्याच नाटक करीत आहे.
शरद पवार आणि या सगळ्या मंडळींना आव्हान
‘माझं आव्हान आहे शरद पवार आणि या सगळ्या मंडळींना, मराठा आरक्षणाचा मुद्दा कोर्टाच्या ऐरणीवर तुम्ही कसं आणणार आहात ते आधी सांगा. मी गरीब मराठ्यांना आवाहन करतो की, तुम्ही वंचित सोबत या, गरीब मराठ्यांच्या सवलतीचा प्रश्न गव्हर्नर च्या माध्यमातून पुनः कोर्टाच्या टेबलवर घेऊन जाऊ.’
शरद पवार कारखान्याचे प्रतिनिधि
शरद पवार हे शेतकऱ्यांचे प्रतिनिधि नाहीत तर ते कारखान्यांचे प्रतिनिधी आहेत हे आपण लक्षात घेतल पाहिजे. यांनी आतापर्यंत हमीभावाचा कायदा केला नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
12 किलोमीटर हद्द चिनकडे गेली
चीन ने भारतीय सीमा वादावर गलवान घाटी आणि लद्दख भागात चीन 20 किलोमिटर भारताच्या हद्दीत आला आहे. टेंट टाकलेत, आर्मी लावली आहे, हे खरंय की खोट आहे हे सरकारने सांगावे, असा प्रश्न यावेळी त्यांनी विचारला. माझ्यावर विश्वास नका ठेऊ पान भाजप खासदार आणि माजी परराष्ट्र मंत्री सुब्रमण्यम स्वामी म्हणताहेत की 12 किलोमीटर हद्द चिनकडे गेली आहे.
मोदींना तिहार जेल मध्ये कैद केल्याशिवाय राहणार नाही.
जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांनी बंगालच्या निवडणुकीत सांगितले होते की, तुम्ही जर मोदींना निवडून दिल तर तुमचा व्यापार हा गुजरात्याला जाईल. हे लुटीच सरकार आहे. सगळ्यात मोठा चोर कोणी असेल तर इथला नरेंद्र मोदी आहे. अजून त्याच्या चोऱ्यांच्या कहाण्या आम्ही सांगितल्या नाहीत. ना खाऊंगा ना खाणे दुंगा, अस म्हणणारा फक्त गुजरात्यांनाच खायला घालतो आणि दुसऱ्याच्या ताटातल काढतो. यांनी इतरांना तिहार जेल दाखवल आहे. आम्ही मोदींना तिहार जेल मध्ये कैद केल्याशिवाय राहणार नाही. मागील सरकार असताना दोन लाख कोटी खाल्ले असे मीडिया सांगत होता तर आता मोदींनी पंधरा हजार कोटी खाल्ले ते सुद्धा माध्यमांनी दाखवल पाहिजे. सगळे चॅनल हे मोदींनी अडानी आणि अंबानी यांना विकत घ्यायला लावले आहेत. त्यामुळे टिव्ही मध्ये मोदी विरोधात बातम्या येत नाही असा आरोपही त्यांनी केला.
माणूस आणि माणुसकी राहिली पाहिजे
जे हारेगावला केल ते एक भीतीच वातावरण करण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपीला लवकरात लवकर पकडण्याचे पोलिसांना सांगितल आहे. लोक चिडलेले आहेत. या देशात माणूस आणि माणुसकी राहिली पाहिजे हे लक्षात घेतल पाहिजे. त्यांनी शाहु महाराजांच्या कोल्हापुरात दंगल करण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूर मध्ये बाहेरून लोक आणून दंगल केली. आपण संघटित राहील पाहिजे एकजुटीने राहील पाहिजे. इथला गरीब मराठा, धनगर, माळी, क्रिश्चन, मुस्लिम, बौद्ध, दलित, आदिवासी हा एकत्र राहिला तर हे आरएसएस वाले काही करणार नाहीत.
मोहन भगवतला सुद्धा जेल मध्ये टाकू
तुम्ही मला सत्ता द्या मोहन भगवतला सुद्धा जेल मध्ये टाकू. तुम्हाला शस्त्र बाळगण्याचा अधिकार कोणी दिला. एके 47, शस्त्र त्यांच्या पुजेमध्ये दिसतात. हे हत्यार आरएसएस कडे आले कोठून, असा प्रश्न बाळासाहेबांनी विचारला. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमेवर हत्याराचे मार्केट आहे. तिथूनच हे शस्त्र मणिपूर ची परिस्थीती ही देशामध्ये सुद्धा होऊ शकते अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.
भाजपला हरविण्याचा निर्धार करा
निवडणूक कधीही लागू शकते. 2 हजाराच्या नोट बंद केल्या तेव्हाच मी म्हणालो होतो निवडणूक लवकर लागू शकतात. कारण विरोधी पक्षांची आर्थिक कोंडी करून, तयारीला वेळ न देता निवडणुका लावण्याचे चिन्ह दिसत आहेत. त्यामुळे प्रचार करायला वेळ मिळेल न मिळेल पण तुम्ही आताच निर्धार करा की माझं मत हे भाजप विरोधातच राहणार!