कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव पाहता टास्क फोर्स पुनर्गठीत करण्याचा निर्णय; आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जगातील कोरोनाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. सर्व पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यांमध्ये आरोग्य सुविधा सज्ज राहतील याची दक्षता घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी संबंधित यंत्रणांना दिले.

    नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde CM) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis DCM) यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोना विषाणू प्रादुर्भाव उपाययोजनांची आढावा बैठक नागपूर विधानभवनात घेण्यात आली. या बैठकीत कोरोना संदर्भातील टास्क फोर्स पुनर्गठीत करण्याचा निर्णय झाला. राज्यातील तज्ज्ञ डॉक्टर आणि अधिकारी या टास्क फोर्समध्ये असतील. त्यामुळे कोरोना परिस्थितीवर केंद्र आणि राज्य सरकार बारीक लक्ष ठेवून आहे.

    जगातील कोरोनाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. सर्व पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यांमध्ये आरोग्य सुविधा सज्ज राहतील याची दक्षता घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी संबंधित यंत्रणांना दिले.

    मुख्य सचिवांनी देखील तातडीने सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून कोविड अनुरूप वर्तन पंचसुत्रीचे काटेकोर पालन होईल, हे पाहण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

    राज्यातील कोविड परिस्थिती पूर्ण नियंत्रणात असली तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर मात्र चीन, जपान, अमेरिका, ब्राझील या देशांमध्ये रुग्ण वाढताना दिसत आहेत. विशेषत: चीनमध्ये रुग्ण संख्या वेगाने वाढत असल्याचे माध्यमातील बातम्यांवरून दिसत आहे.

    चीनमध्ये कोविड विषाणूचा बीएफ-७ हा प्रकार अधिक वेगाने वाढताना आढळत आहे. सध्या चीन, जपान, अमेरिका, ब्राझील, दक्षिण कोरीया या देशांमध्ये कोविड रुग्णसंख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील जनुकीय क्रमनिर्धारण व्यवस्थेची माहिती आणि आढावा या बैठकीत घेण्यात आला.

    राज्यात सध्या २२१६ कोविड रुग्णालये असून १ लाख ३४ हजार विलगीकरण खाटा आहेत. चाचण्या, ट्रॅकिंग, उपचार, लसीकरण आणि कोविड अनुरूप वर्तन अशी पंचसूत्री राबविण्याचे केंद्र शासनाने निर्देश दिले आहेत. त्यानुसार पंचसूत्रीची अमंलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी आज झालेल्या आढावा बैठकीत दिले.

    आज झालेल्या बैठकीला वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, अन्न व औषध प्रशासनमंत्री संजय राठोड, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्यासह आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.