राम मंदिराच्या उद्घाटन दिनी सार्वजनिक सुट्टी जाहीर करा; भाजप आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

राममंदिराच्या अनुषंगाने आयोजित कार्यक्रमांना सर्वांना उपस्थित राहता यावे, यासाठी सार्वजनिक सुट्टी आवश्यक आहे. खासगी आस्थापनांना आवश्यक ते निर्देश द्यावेत, असं अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

    भारताच्या इतिहासामध्ये 22 जानेवारी 2024 चा दिवस सुवर्ण अक्षरात नोंदवला जाईल, कारण या दिवशी अनेक वर्षांनी रामलल्ला अयोध्येतील त्यांच्या भव्य राम मंदिरात निवास करतील. अयोध्येत आता श्रीरामाच्या अभिषेकाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे २२ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करा, अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांची मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
    राममंदिराच्या अनुषंगाने आयोजित कार्यक्रमांना सर्वांना उपस्थित राहता यावे, यासाठी सार्वजनिक सुट्टी आवश्यक आहे. खासगी आस्थापनांना आवश्यक ते निर्देश द्यावेत, असं अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. या मागणीचे पत्र आमदार भातखळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.
    पत्रात नेमकं काय लिहिलंय?
    २२ जानेवारी हा दिवस भारताच्या इतिहासातील ऐतिहासिक दिवस ठरणार आहे. सुमारे ५००-५५० वर्षांचा संघर्ष या प्रभू राम मंदिर उभारणीसाठी करण्यात आला आहे. शेकडो राम भक्तांनी यामध्ये आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात हे मंदिर उभारणीचे काम झाले आहे. प्रभू श्री राम मंदिरात विराजमान होणार या दिवसाची तमाम राम भक्तांना प्रतीक्षा आहे.
    त्या दिवशी घरोघरी दिवे लावून दिवाळी साजरी करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. प्रत्यक्ष जाता येत नसले तरी त्या दिवशी आपापल्या भागात विविध कार्यक्रमाचे आयोजन सर्वत्र करण्यात आले आहे. या सर्व प्रकारच्या कार्यक्रमांना उपस्थित राहता यावे, सोहळ्यात सहभागी होता यावे, यासाठी त्या दिवशी शासनाने सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी तसेच खासगी आस्थापनांना अशा स्वरूपाचे निर्देश देण्यात यावेत, अशी मागणीही आमदार भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.