आटपाडी, जत कवठेमंकाळ व तासगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा ;  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे आमदार गोपीचंद पडळकर यांची मागणी

खरीप हंगाम २०२३ सांगली जिल्ह्यातील आटपाडी, जत, कवठेमहांकाळ व तासगाव तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करावेत यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मागणी केली आहे

    आटपाडी : खरीप हंगाम २०२३ सांगली जिल्ह्यातील आटपाडी, जत, कवठेमहांकाळ व तासगाव तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करावेत यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मागणी केली आहे
    निवेदनात म्हटले आहे की राज्यातील दुष्काळाचे मूल्यांकन सरकारने खरीप हंगाम २०२३ मध्ये MAHA-MADAT या प्रणालीद्वारे केले आहे. त्यानुसार राज्यातील ४२ तालुक्यांचा TRIGER- २ मध्ये समावेश केला आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी, जत, कवठेमहांकाळ व तासगाव हे तालुके कायम दुष्काळी म्हणून ओळखले जातात. MAHA-MADAT या प्रणालीद्वारे केलेले दुष्काळाचे मूल्यांकन हे चुकीचे असून आटपाडी तालुक्यात एकूण पावसाच्या १२० दिवसापैकी ८५ दिवस पाऊस पडलेला नाही,  जत तालुक्यात एकूण पावसाच्या १२० दिवसापैकी ७६ दिवस पाऊस पडलेला नाही, कवठेमहांकाळ तालुक्यात एकूण पावसाच्या १२० दिवसापैकी ७६ दिवस पाऊस पडलेला नाही, तासगाव तालुक्यात एकूण पावसाच्या १२० दिवसापैकी ५५ दिवस पाऊस पडलेला नाही तरी सुद्धा सदर तालुक्यांचा TRIGER- २ मध्ये समावेश नाही.
    दि. २९ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये या विषयावर चर्चा झाली. भूवैज्ञानिक यांच्या मार्फत भूजल सर्वेक्षण करून सदर तालुक्यांचा TRIGER – २ मध्ये समावेश करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आपल्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
    तरी सदर चारही तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृष्य परिस्थिती असल्यामुळे वस्तुस्थितीचा विचार करून सांगली जिल्ह्यातील आटपाडी, जत, कवठेमहांकाळ व तासगाव या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे