सोलापूर जिल्ह्यात आठवडाभरात दुष्काळ जाहीर करा, नाहीतर… ; ठाकरे गटाचे प्रवक्ते लक्ष्मण हाके यांचा इशारा

येत्या आठवड्यात जर चारा डेपो चालू झाले नाहीत आणि सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केला नाही तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने सोलापूर जिल्ह्यात उग्र आंदोलन केले जाईल, असा इशारा प्रवक्ते लक्ष्मण हाके यांनी दिला.

    माळशिरस : चालू हंगामात पाऊस पडत नसल्यामुळे माळशिरस तालुक्यातील मेंढपाळ शेतकरी अडचणीत आला असून, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, याचं पार्श्वभूमीवर आज शिवसेना प्रवक्ते (ठाकरे गट) यांनी माळशिरस तालुक्यातील पिलीव, सुळेवाडी, कारखेल, जळभावी, गोरडवाडी, गारवाड, आदी गावांमध्ये जाऊन मेंढपाळ शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

    दरम्यान यावेळी हाके म्हणाले, पाऊस पडत नसल्यामुळे मेंढपाळ शेतकरी अडचणीत आला आहे. त्यांच्या जनावरांना चारा सुद्धा मिळत नाही. सरकारने याकडे लक्ष घालावे, चारा डेपो सुरु करावेत, पिण्याच्या पाण्यासाठी त्वरित टॅंकर सुरु करावेत, वन विभागाकडून मेंढपाळांना चराईसाठी परवानगी मिळावी, आदी मागण्या यावेळी हाके यांनी केल्या.

    पुढे बोलताना ते म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी आमदार, खासदार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलायला तयार नाहीत, हे सर्व आमदार, खासदार टेंडर कमिशन यामध्ये गुंतल्याने सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही, येत्या आठवड्यात जर चारा डेपो चालू झाले नाहीत आणि सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केला नाही तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने सोलापूर जिल्ह्यात उग्र आंदोलन केले जाईल, असा इशारा हाके यांनी दिला.

    यावेळी काही मेंढपाळ शेतकरी या लक्षवेधी आंदोलनात सामील झाले. यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख गणेश इंगळे, शिवसेना तालुकाप्रमुख संतोष राऊत, युवा सेना तालुकाप्रमुख सुभाष काकडे, युवासेना उपतालुकाप्रमुख डॉक्टर निलेश कांबळे, दत्तात्रय साळुंखे, दुर्वा आडके, संदीप कदम, शिवसेना शहर प्रमुख योगेश देशमुख, युवा सेना शहर प्रमुख देवा लोखंडे, इत्यादी या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते.