दर जाहीर करा अन्यथा ऊस वाहतूक बंद पाडू; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा

खटाव तालुक्यात ऊस दर जाहीर करण्याच्या मागणीसाठी आणि मागील गाळप हंगामातील शिल्लक रक्कमेच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रस्त्यावरच्या लढाईची तयारी सुरू केली आहे.

    सातारा : खटाव तालुक्यात ऊस दर जाहीर करण्याच्या मागणीसाठी आणि मागील गाळप हंगामातील शिल्लक रक्कमेच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रस्त्यावरच्या लढाईची तयारी सुरू केली आहे.

    राज्य प्रवक्ते अनिल पवार यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पडळ आणि गोपूज कारखान्यावर मोटरसायकल रॅली काढत ऊसाच्या पहिल्या उचलीसाठी आक्रमक होणार असल्याचे संकेत दिले आहे.

    राज्य प्रवक्ते अनिल पवार म्हणाले, ऊस गाळप हंगाम सुरू करण्यापूर्वी साखर कारखान्यानी कायद्यानुसार दर जाहीर करणे अभिप्रेत आहे. मात्र पडळ आणि गोपुज साखर कारखान्यांकडून दर जाहीर न करताच ऊस तोड सुरू केली आहे. त्याला संघटनेचा विरोध आहे.

    युवा प्रदेश सरचिटणीस सूर्यभान जाधव आणि खटाव मान संपर्कप्रमुख शरद खाडे,केशव जाधव यांनी मनोगते व्यक्त केले. रॅलत संतोष तुपे, अविनाश बागल, अजय पाटील दादा पाटील, विजय माने, माजी सरपंच बापुसो पवार, तानाजी पवार यांच्यासह माण तालुक्यातील बीजवडी शाखेचे पदाधिकारी, विखले, दातेवाडी, उंबर्डे, भोसरे, गोपुज, खातवळ, गणेशवाडी हिंगने, कातरखटाव, बोबाळे, भूरकवडी, पेडगाव, आणि परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

    पडळ कारखान्यावर शेती अधिकारी किरण पवार तर गोपुज कारखान्यावर प्रशासकीय अधिकारी जगदीश यादव आणि मुख्य अकाउंट अधिकारी हणमंत पाटील यांनी संघटनेचे निवेदन स्वीकारले.

    शेतकऱ्यांना विनंती करणार

    दुष्काळ, रासायनिक खते आणि औषधांचे वाढलेले दर यामुळे ऊस शेतीचा उत्पादन खर्च एकरी २५०० रुपयांवर गेला आहे. त्यामुळे आगामी चार दिवसात ऊस दर जाहीर केला नाही, तर आम्ही शेतकऱ्यांना विनंती करून ऊस तोड बंद ठेवणार आहोत. वाहनधारकांनाही ऊस वाहतूक करू देणार नाही, असा इशारा राज्य प्रवक्ते अनिल पवार यांनी दिला आहे.

    दिवाळीसाठी दुसरा हप्ता द्या

    जयसिंगपूर ऊस परिषदेत ठरल्याप्रमाणे यंदाच्या गाळप हंगामातील पहिली उचल ३५०० रुपये आणि मागील गाळप हंगामातील साखरेच्या वाढीव फायद्यातील आणि उपदार्थातील जास्तीचे शिल्लक राहणाऱ्या पैशांच्या रूपाने दुसरा हप्ता दिवाळीसाठी शेतकऱ्यांना द्यावा, अशी मागणी तालुकाध्यक्ष दत्तु घार्गे केली आहे.

    ऊस तोडी सुरू ठेवल्यास संघर्ष

    पडळ साखर कारखान्याला निवेदन दिल्यानंतर ही रॅली धोंडेवाडी, गोरेगाव, अंबवडे, गुरसाळे आणि गोपुज कारखान्यवर नेण्यात आली. बळजबरीने ऊस वाहतूक अथवा ऊस तोडी सुरू ठेवल्या तर ऊस दरावरून संघर्ष झाला तर होणाऱ्या नुकसानीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेला जबाबदार धरू नये, असा इशारा युवा जिल्हाध्यक्ष तानाजी देशमुख यांनी दिला.