
गणेशोत्सवामुळे सध्या बाजारात उत्साहाचे वातावरण आहे. कच्चा मालाचे (Raw Materials) दर वाढल्याने त्याचा परिणाम सर्व वस्तूंवर पडला आहे. वाढलेल्या दरांमध्ये सजावट साहित्याचा समावेश असून, किंमती 20 टक्क्यांनी वाढल्या आहेत.
संभाजीनगर : गणेशोत्सवामुळे सध्या बाजारात उत्साहाचे वातावरण आहे. कच्चा मालाचे (Raw Materials) दर वाढल्याने त्याचा परिणाम सर्व वस्तूंवर पडला आहे. वाढलेल्या दरांमध्ये सजावट साहित्याचा समावेश असून, किंमती 20 टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे एकीकडे सणावर महागाईचे सावट आहे. तर दुसरीकडे गणेशभक्तांमधील उत्साह कायम असल्याचे चित्र आहे.
महिनाभरावर असलेल्या गणेशोत्सवासाठी आत्तापासूनच गणेश भक्तांची तयारी सुरू झाली आहे. सोशल मीडियामुळे मात्र, गणेशभक्त स्वतः आरास तयार करायची की नव्याने साहित्य विकत घ्यायचे या संभ्रमावस्थेत असल्याचे चित्र आहे. भाववाढीमुळे यंदा गणरायाच्या आगमनासाठीचे आर्थिक गणित जुळवताना गणेशभक्तांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. सजावटीसाठी बाजारांमध्ये विविध प्रकारचे एलईडी दिवे, तोरण, कृत्रिम फुले, मखर, स्प्रेपेंट, चमकदार झुंबर, माळा विविध प्रकारची नक्षी असलेले स्टिकर आले आहेत.
शहरातील विविध बाजारपेठा सजावटीच्या साहित्यांनी फुलून गेल्या आहेत. गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा करण्यासाठी आकर्षक सजावट करण्यावर भर दिला जात आहे. यंदा बाजारात चिनी बनावटीच्या वस्तू पूर्णपणे हद्दपार झालेल्या दिसत आहेत. ग्राहकांकडून भारतीय बनावटीच्या वस्तूंना अधिक प्राधान्य दिले जात आहे.
मखर साडेतीन हजारात
गेल्या वर्षी 40 ते 70 रुपयांना मिळणारे कृत्रिम फुलांचे गुच्छ, तोरण व माळा 60 ते 110 रुपयांना मिळत आहेत. तसेच गेल्या वर्षी 100 रुपयांना उपलब्ध असणारे एलईडी दिव्यांचे तोरण यंदा 150 ते 160 रुपयांना विकले जात आहे. त्यात मखर साडेतीन हजार रुपयांमध्ये मिळत आहे.