deepak kesarkar

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर आम्ही आनंद साजरा केल्याचं म्हटलं जात आहे.  मात्र इथं शिवसेना आमदारांपैकी कुठल्याही आमदाराने आनंद साजरा केला नाही. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा (Uddhav Thackeray Resignation) द्यावा यासाठी आम्ही बंड केलं नाही. आमचं बंड आघाडीच्या विरोधात होतं ,अशी प्रतिक्रिया दिपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिली आहे.

    पणजी: एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) अनेक आमदारांनी बंड पुकारलं. त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार अल्पमतात आलं. परिणामी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यावर एकनाथ शिंदे गटाची भूमिका दिपक केसरकर यांनी व्यक्त केली आहे. “उद्धव ठाकरेंनी राजीनामा (Uddhav Thackeray Resignation) द्यावा यासाठी आम्ही बंड केलं नव्हतं. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यानंतर आम्ही कुणीही आनंद साजरा केला नाही. आम्ही आजही शिवसेनेत आहोत,” असं दिपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी म्हटलं आहे. ते गोव्यात (Goa) पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

    दीपक केसरकर म्हणाले, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर आम्ही आनंद साजरा केल्याचं म्हटलं जात आहे.  मात्र इथं शिवसेना आमदारांपैकी कुठल्याही आमदाराने आनंद साजरा केला नाही. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा यासाठी आम्ही बंड केलं नाही. आमचं बंड आघाडीच्या विरोधात होतं. उद्धव ठाकरेंचं मन दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता. आम्ही आजही शिवसेनेत आहोत. शिवसेनेत ठाकरे कुटुंबाला कोणाचाही विरोध नाही.”

    ते पुढे म्हणाले की,“एकनाथ शिंदे मुंबईला मंत्रीपदाच्या वाटपात मोठा वाटा मिळावा म्हणून गेलेले नाही. महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी काय करता येईल त्यावर ते मुंबईत चर्चा करणार आहेत. दोन्ही पक्ष मिळून जो निर्णय घेतील त्यात आम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत असू,” अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली.

    दीपक केसरकर म्हणाले, “भाजपा राष्ट्रीय पक्ष असल्याने देवेंद्र फडणवीस त्यांच्या राष्ट्रीय नेत्यांशी बोलून निर्णय घेणार आहेत. अजुन कोणत्याही मंत्र्याची नावं ठरलेली नाही. इथे असलेल्या आमदारांमध्ये चलबिचल करण्यासाठी खोट्या बातम्या पेरल्या जात आहेत.”

    “एकनाथ शिंदे आनंद दिघेंचे मानसपुत्र असून त्यांच्याप्रमाणे ते एकवचनी आहेत. त्यांनी एका मोठ्या पक्षाला शब्द दिला होता. त्यामुळे आम्ही हा शब्द फिरवणं शक्य नव्हतं. आता जी युती होत आहे ती महाराष्ट्राच्या जनेतेने निवडून दिलं त्यांची होत आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी पाठीत खंजीर खुपसल्याची भाषा करू नये. पाठीत कुणी खंजीर खुपसला असेल तर तो संजय राऊत यांच्यासारख्या लोकांनी खुपसला. त्यांनी चुकीचा सल्ला दिला. संजय राऊत स्वतः शिवसेनेत आहेत, मात्र निम्म काम राष्ट्रवादीचं करत असतात. त्यावेळी ते जनतेच्या पाठीत खंजीर खुपसत असतात.” असं केसरकर म्हणाले.

    ते पुढे म्हणाले की, “आज महाराष्ट्रात अशी परिस्थिती आहे आहे की संजय राऊत यांनी सकाळी ९ वाजता उठून एक पत्रकार परिषद घ्यायची. केंद्रावर टीका करायची आणि केंद्र व राज्यात वाद लावून द्यायचा असं सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्राची प्रगती करायची असेल तर केंद्र व राज्य यात चांगले संबंध असावे लागतील. हीच आमची भूमिका आहे.”

    दीपक केसरकर म्हणाले, “मला विचारण्यात आलं की उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या १६ आमदारांचं काय होईल? त्यावर मी सांगितलं आहे की ज्यावेळी बहुसंख्य आमदार आपला नेता निवडतात त्या नेत्यासोबत त्यांना रहावं लागतं. आम्ही विधीमंडळात आमचा पक्षाची नोंदणी केली तेव्हा आम्ही आमच्या आमदारांच्या स्वाक्षरी दिल्या आहेत. त्यामुळे १६ आमदार आपला निर्णय बदलू शकत नाही. बहुसंख्यांकांनी निवडलेल्या नेत्याचा व्हिप त्या १६ आमदारांना देखील बंधनकारक राहील. आम्ही त्यांना आमच्यासोबत चला असा म्हणणार नाही.”

    “पक्षांतर बंदी कायदा विधीमंडळात काय कृती करता यावर लागू होतो. व्हिपने हजर राहण्यास सांगितलं, मतदान करायला सांगितलं तर तसं करावं लागतं. कायद्यात ‘ऑन द फ्लोअर ऑफ द हाऊस’ असं स्पष्ट म्हटलं आहे. पक्षाची घटना बंधनकारक आहे अशी जनतेची दिशाभूल केली जात आहे. देशाची घटनाच अंतिम आहे असे न्यायालयाचे अनेक निकाल आहेत. त्याला डावलून इतर कोणतीही घटना काम करू शकत नाही,” असं मत दीपक केसरकर यांनी व्यक्त केलं.