हजारे यांच्याविषयी बदनामीकारक मजकूर; आमदार जितेंद्र आव्हाड यांना नोटीस

समाजमाध्यमात बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे.

    पुणे : समाजमाध्यमात बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. आव्हाड यांनी हजारे यांचे छायाचित्र समाजमाध्यमात प्रसारित केले.

    ‘या माणसाने देशाचे वाटोळे केले. टोपी घातली म्हणजे कोणी गांधी होत नाही,’ असा मजकूर आव्हाड यांनी समाजमाध्यमात प्रसारित केला होता. हजारे यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी त्यांचे पुण्यातील कायदेशीर सल्लागार ॲड. मिलिंद पवार यांच्यामार्फत आव्हाड यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे.

     

    सध्या राजकारणातील घडामोडींमुळे वातावरण गढूळ झाले आहे. हजारे यांचा काही संबंध नसताना त्यांच्याविषयक बदनामीकारक मजकूर आव्हाड यांनी प्रसारित केला आहे. आव्हाड यांनी जाणीवपूर्वक बदनामी केली. त्यामुळे त्यांना कायदेशीर नोटीस बजाविण्यात आली आहे. संबंधित नोटीशीची प्रत माहितीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनाही पाठविण्यात आली आहे, असे ॲड. पवार यांनी सांगितले.