राज्यसभेतील विजयानंतर खासदार धनंजय महाडिक म्हणाले, ‘महाविकास आघाडीच्या दबावतंत्रामुळे…’

महाविकास आघाडीने दबावतंत्र वापरून त्यांच्या उमेदवारांना कोंडून ठेवले होते. हे तंत्र संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यामुळेच त्यांच्या उमेदवारांचा पराभव झाला, असा आरोप भाजपचे नूतन राज्यसभा खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी साताऱ्यात केला.

    सातारा : महाविकास आघाडीने दबावतंत्र वापरून त्यांच्या उमेदवारांना कोंडून ठेवले होते. हे तंत्र संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यामुळेच त्यांच्या उमेदवारांचा पराभव झाला, असा आरोप भाजपचे नूतन राज्यसभा खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी साताऱ्यात केला.

    राज्यसभेच्या खासदारपदी निवड झाल्यानंतर प्रथमच मुंबईवरून कोल्हापूरला जात असताना सातारा शहरात चाहूर येथील हॉटेल महेंद्र एक्झिक्युटिव्ह व महामार्गावरील हॉटेल राजेशाही येथे त्यांचे उदयनराजे युवा मित्र समूह आणि सातारा जिल्हा भाजप व कार्यकारणीच्या वतीने स्वागत करण्यात आले. उदयनराजे मित्र समूहाचे सक्रीय सदस्य व युवा उद्योजक संग्राम बर्गे यांनी त्यांचे पेढ्याचा हार घालून स्वागत केले. तत्पूर्वी चाहूर येथे भाजपचे सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, नगरसेवक धनंजय जांभळे, सरचिटणीस विठ्ठल बल शेटवार या सदस्यांनी पुष्पगुच्छ देऊन महाडिक यांचे स्वागत करून त्यांना आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

    त्यावेळी पत्रकारांशी बोलताना महाडिक यांनी आपल्या विजयानंतरची पहिली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, भाजप या निवडणुकीमध्ये अत्यंत खुलेपणाने प्रक्रियेला सामोरा गेलेला पक्ष आहे. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत भाजपचे उमेदवार त्यांच्या-त्यांच्या मतदारसंघांमध्ये खुलेपणाने फिरत होते. पक्षीय बलाबल तसेच राजकीय परिस्थिती याचा अंदाज चाणाक्षपणे घेत विरोधी पक्षनेते आमदार देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वापरलेल्या रणनीतीचा निश्चितच फायदा झाला. मात्र, महाविकास आघाडीने दबावतंत्राचा वापर करून आपल्या उमेदवारांना एका विशिष्ट ठिकाणी हॉटेलमध्ये ठेवले होते. हे दबावतंत्र संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे.

    राजकारणातल्या या तंत्रामुळे त्यांचा उमेदवाराचा पराभव झाला आहे. आमच्या नेत्यांनी अत्यंत चाणाक्षपणे राजकीय परिस्थिती हाताळत शेवटपर्यंत दाद मागितल्याने परिस्थिती सोपी झाली. या विजयाचे श्रेय पक्षाला आणि आमची प्रचार यंत्रणा राबवणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना समर्पित आहे. यापुढे भाजपच्या पश्चिम महाराष्ट्रातील मोर्चेबांधणीमध्ये पक्ष आदेशाप्रमाणे कायमच माझे सक्रिय योगदान राहील, असे आश्वासन यावेळी धनंजय महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.