
- ईडीकडून स्वतंत्र तपास; हजारो गुंतवणूकदार
पुणे : पुण्यासह राज्यातील गुंतवणूकदारांना व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनीच्या विविध योजनांत चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून कोट्यावधींची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. हजारो गुंतवणूकदारांची यात फसवणूक झाली असून, या फसवणूकीत १०० कोटींहून अधिकची फसवणूक झाल्याचा अंदाज आहे. त्यानूसार, ईडीने पुण्यातील उद्योजक विनोद खुटेसह ५ जणांवर गुन्हा नोंद केला आहे. फसवणूकीची रक्कम हवाला मार्फत परदेशात पाठवल्याचेही तक्रारीत म्हंटले आहे.
याप्रकरणी ईडीचे असिस्टंट डायरेक्टर रत्नेशकुमार भुवनेश्वरलाल कर्ण (वय ४३) यांनी भारती विद्यापीठ पोलिसांत सोमवारी (दि ९) तक्रार दिली आहे. त्यानुसार विनोद तुकाराम खुटे, संतोष तुकाराम खुटे, मंगेश खुटे, किरण पितांबर अनारसे, अजिंक्य बडधे व त्यांच्या इतर साथीदारांवर आयपीसी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २०२० ते ऑक्टोबर २०२३ कालावधीत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्योजक विनोद खुटे व त्याच्या साथीदारांनी संगनमत व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनी व ग्लोबल अॅफिलेट बजनेस कंपनीच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना प्रतिमाह २ ते ३ टक्के दराने परतावा देण्याचे आमिष दाखवले. पॉन्जी स्कीम चालवून लोकांकडून कंपनीच्या बँक खात्यात पैसे न घेता इतर बँकेतील बोगस खात्यावर पैसे घेतले. कमीशन देण्याचे आमिष दाखवत स्किममध्ये इतर लोकांना पैसे गुंतवण्यास सांगत त्यांची आर्थिक फसवणूक केली.
विनोदने इतर साथीदारांच्या मदतीने फोरेक्स ट्रेडींगच्या नावाखाली काना कॅपीटल नावाची कंपनी सुरु केली. कंपनीमार्फत गुंतवणूक करण्यासाठी झुम/ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम घेतले. लोकांना फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून अनेक बनावट कंपन्या (शेल) उभारल्या. कंपन्यांच्या बोगस बँक खात्यात पैसे भरण्यास सांगून काही दिवसांनी फॉरेक्स ट्रेडींग करायला लावले. यानंतर काना कॅपीटल ही कंपनी बंद केली. यातील आलेले पैसे बेकायदेशीरपणे हवालामार्फत परदेशात पाठवण्यात आल्याचे ईडीच्या तपासात समोर आले आहे. आरोपींनी अनेक लोकांची १०० कोटी पेक्षा जास्त रुपयांची फसवणूक केली आहे. पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा पुणे शहर करीत आहे.
ईडीकडून स्वतंत्र तपास…
सक्तवसुली संचनालय विभागाकडून या गुन्ह्याचा स्वतंत्र तपास सुरू करण्यात आला आहे. त्यानूसार छापेमारी देखील केली आहे. तत्पुर्वी यातील मुख्य आरोपी विनोद खुटे हा देशाबाहेर पळून गेल्याची माहिती असून, इतर आरोपीही गायब आहेत. हवाला मार्फत पैसा बाहेर पाठविल्याने यातील पैसे नेमका कुठे गेला असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. फसवणूकीचा तपास पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.