Lalit Patil
Lalit Patil

  पुणे : ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा मुक्का जाणीवपूर्वक वाढविण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली असून, डॉ. संजीव ठाकूर यांनी त्याच्यावरील उपचाराला जाणीवपूर्वक विलंब करत त्याचा मुक्काम त्यांनी वाढविला आहे. ठाकूर यांच्या जबाबातून ही बाब उघड झाली असून, पुणे पोलिसांनी आता कायदेशीर कारवाई करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागाच्या मुख्य सचिवांना प्रस्ताव पाठविला आहे. डॉ. ठाकूर यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्याचे प्रस्तावात नमूद केले आहे.

  खासगी फ्लॅटमध्येही मैत्रिणींसोबत राहिल्याचे वास्तव

  पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ससून रुग्णालयाच्या गेटवर दोन कोटी १४ लाखांचा एमडी हा ड्रग्ज पकडला होता. याप्रकरणाचा तपास करत असताना अनेक धक्कादायक बाबीसमोर आल्या होत्या. तसेच, येरवडा कारागृहात असलेल्या ललित पाटील हा हे ड्रग्ज रॅकेटही चालवित असल्याचे समोर आले होते. दरम्यान, तो रुग्णालयात इतक्या दिवस कसा राहतो, यावरून उलट-सुलट चर्चा सुरू होत्या. पुणे पोलिसांनी केलेल्या तपासानंतर तो रुग्णालयातून हॉटेलात व खासगी फ्लॅटमध्येही मैत्रिणींसोबत राहिल्याचे वास्तव समोर आले होते.

  ललितचा ससूनमधील मुक्काम वाढविला

  त्यामुळे ललितच्या मागे रुग्णालयातील बड्या डॉक्टरचा हात असल्याची चर्चा होती. आता याप्रकरणात डॉ. ठाकूर यांचा गुन्हे शाखेने आतापर्यंत तीन वेळा जबाब नोंदविला. ललितला नेमक्या कोणत्या आजाराने ग्रासले होते. त्याचे विश्लेषण करण्यात आले का ?, त्याच्यावर कोणते उपचार करण्यात आले, तसेच उपचारास विलंब का झाला ? याबाबतची माहिती पोलिसांना जबाबातून मिळाली. डॉ. ठाकूर यांनी उपचारास विलंब करून ललितचा ससूनमधील मुक्काम वाढविला. पाटीलला रुग्णालयातून पसार होण्यासाठी अप्रत्यक्षपणे सहाय केले, असे डॉ. ठाकूर यांच्या जबाबातून निष्पन्न झाले आहे, अशी माहिती गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली.

  डॉ. ठाकूर यांनी ललितच्या पित्ताशयाची शस्त्रक्रिया करण्याचे निश्चित केले होते. ललितवर पोलिसांनी कारवाई केल्यानंतर लगोलग शस्त्रक्रिया निश्चित कशी करण्यात आली, यामागचे कारण पोलिसांकडून शोधले.

  डॉ. ठाकूर यांच्यावर पोलिसांना सबळ पुरावे

  ललित पाटील प्रकरणात डॉ. ठाकूर यांच्यावर पोलिसांना सबळ पुरावे मिळाले असून, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागाच्या मुख्य सचिवांना प्रस्ताव पाठविला आहे. डॉ. ठाकूर यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास डॉ. ठाकूर यांना अटक होण्याची शक्यता आहे.

  येरवडा कारागृहातील समुपदेशकाला अटक

  ललित पाटीलने ससूनमधून पसार झाल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील डॉ. संजय मरसाळे यांना गेल्या महिन्यात अटक केली होती. यापूर्वी येरवडा कारागृहातील समुपदेशकाला अटक केली होती. या प्रकरणात आतापर्यंत दोन पोलीस कर्मचारी, कारागृहातील दोन कर्मचारी, तसेच ससून रुग्णालयातील एका कर्मचाऱ्यासह २० जणांना अटक करण्यात आली आहे. डॉ. ठाकूर यांना पदमुक्त करण्यात आले आहे.