सोसायट्यांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र विभाग तयार करण्याची मागणी

मुंबई शहरात सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांच्या विविध तक्रारींसाठी स्वतंत्र विभाग तयार करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर पिंपरी चिंचवड शहरातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये देखील एक स्वतंत्र विभाग तयार करावा. त्यासाठी स्वतंत्र अधिका-याची नेमणूक करावी, अशी मागणी चिखली, मोशी, पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनने पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्याकडे केली आहे.

    पिंपरी :  मुंबई शहरात सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांच्या विविध तक्रारींसाठी स्वतंत्र विभाग तयार करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर पिंपरी चिंचवड शहरातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये देखील एक स्वतंत्र विभाग तयार करावा. त्यासाठी स्वतंत्र अधिका-याची नेमणूक करावी, अशी मागणी चिखली, मोशी, पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनने पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्याकडे केली आहे.

    फेडरेशनकडून पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले. पिंपरी-चिंचवड शहरात सुमारे सहा हजार पेक्षा अधिक सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत. त्यातील अनेक सोसायट्यांमध्ये बांधकाम व्यावसायिकांनी नियमबाह्य कामे केली आहेत. सोसायट्यांचे पदाधिकारी, सदस्य अशा बाबतीत तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले असता तिथे तक्रार घेण्यासाठी पोलिसांकडून टाळाटाळ केली जाते. ब-याच वेळेला बांधकाम व्यावसायिक सोसायट्यांमधील सदस्यांना धमक्या देतात, धाकदपटशाही करतात. याबाबतही पोलीस तक्रार घ्यायला टाळाटाळ करतात. काही वेळेला केलेली तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणला जातो. मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी मुंबई शहरातील सर्व गृहनिर्माण संस्थांच्या (सोसायट्या) बांधकाम व्यवसायिकांबाबतच्या तक्रारी नोंदवण्यासाठी तसेच त्यावर कारवाई करण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात एक स्वतंत्र विभाग तयार केला आहे. त्यासाठी स्वतंत्र अधिकारी देखील नेमण्यात आला आहे. त्याच धर्तीवर पिंपरी-चिंचवड शहरात देखील असा विभाग होणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.