माण -खटावला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी; स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून रास्ता रोको

माण खटाव तालुक्यात या वर्षी पावसाने ओढ दिल्याने पिके जळून चालली आहेत. सर्वत्र दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनाने अद्यापही तालुक्यात दुष्काळ जाहीर केला नाही. या निषेधार्थ बिजवडी (ता. माण) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रस्ता रोको करत तीव्र आंदोलन केले.

    सातारा : माण खटाव तालुक्यात या वर्षी पावसाने ओढ दिल्याने पिके जळून चालली आहेत. सर्वत्र दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनाने अद्यापही तालुक्यात दुष्काळ जाहीर केला नाही. या निषेधार्थ बिजवडी (ता. माण) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रस्ता रोको करत तीव्र आंदोलन केले. यावेळी मंडलाधिकारी यांना विविध मागणीचे निवेदन देण्यात आले.

    तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, जनावरांच्या चारा, पाण्याची तात्काळ व्यवस्था करण्यात यावी, दुष्काळी परिस्थितीत माण खटावमधील शेतकऱ्यांवर असणारी सर्व प्रकारची कर्ज माफ करण्यात यावी, सर्व आर्थिक संस्थांकडून शेतकऱ्यांना वसुलीसाठी तगादा लावण्यात येऊ नये व माण- खटाव मधील शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विम्याचे पैसे तत्काळ जमा करण्यात यावेत, या मागणीसाठी बिजवडी शाखेकडून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

    यावेळी राज्य प्रवक्ते अनिल पवार, सूर्यभान जाधव, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष प्रशांत विरकर, मामू वीरकर, युवराज भोसले,केशव जाधव, दत्तू घार्गे, सदाशिव शिनगारे, सतीश भोसले , राहुल शिनगारे,दादासो भोसले, अविनाश गाढवे,आदी मान्यवर उपस्थित होते.

    मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन

    आंदोलनास राष्ट्रवादी काॅग्रेस, राष्ट्रीय समाज पक्ष, वंचित बहूजन आघाडी आदींनी पाठिंबा दिला. आमच्या मागण्या शासनाने माण्य नाही केल्या तर लवकरच दहिवडीत तीव्र आंदोलन करु, असा इशारा संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी दिला.