Demand to file a case under Atrocity against former MP Sanjay Kakde

    पुणे : भुगाव येथील मागासवर्गीय कुटुंबियांची जमीन बळकावण्यासाठी धमकावणे, तसेच वहिवाटीचा रस्ता बंद करून त्यांची अडवणूक केल्याप्रकरणी खासदार संजय काकडे व त्यांच्या साथीदारांवर अॅट्राॅसिटीअंतर्गत गुन्हा नोंद करावा, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गुरुवारी पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. पोलिस प्रशासनाला पुरावे सादर करुनही गुन्हा दाखल केला जात नसल्याने वंचित बहुजन आघाडीने धरणे आंदोलन करत गुन्हा नोंद करण्याची मागणी केली. यावेळी मोठ्या संख्येने आंबेडकरी समाज उपस्थित होता.

    जागा हडप करण्याचा प्रयत्न

    याबाबत तक्रारदार दीपक कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार भुगाव येथे त्यांच्या मालकीची जमीन आहे. या जमिनीच्या बाजूस असलेला रस्ता गेले अनेक वर्षांपासून वापरत आहे. माझ्या जमीनीलगतची सर्व जमीन संजय काकडे यांच्या मालकीची आहे. माझी जमीन मोक्याची जागी असल्याने ती जागाही हडप करण्याचा संजय काकडे यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी संजय काकडे व त्यांच्या साथीदारांकडून मला त्रास दिला जात आहे. काकडे व त्यांच्या साथीदारांकडून जागा हडपण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. याविरोधात अनेकदा पोलिसांत तक्रार दाखल करुनही गुन्हा दाखल केला जात नसल्याचा आरोप कदम यांनी केला आहे.

    तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी

    यापार्श्वभूमीवर गुरुवारी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाषाण येथील पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी संजय काकडे व त्यांच्या साथीदारांविरोधात तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी पोलिसांसोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर तसेच लवकरच गुन्हा दाखल करण्याच्या आश्वासनानंतर सायंकाळी आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती कदम यांनी दिली.