फोटो व्हायरल करण्याची धमकी देत महिलेकडे पैशांची मागणी; मारहाण करत कपडेही फाडले

ओळखीचा फायदा घेऊन मोबाईलमध्ये काढलेले महिलेचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन दोघांनी तिच्याकडे पैशांची मागणी केली. तसेच घरात घुसून या महिलेस मारहाण करत तिचा विनयभंग केल्याची घटना स्थानिक सिव्हिल लाईन भागात घडली.

    खामगाव : ओळखीचा फायदा घेऊन मोबाईलमध्ये काढलेले महिलेचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन दोघांनी तिच्याकडे पैशांची मागणी केली. तसेच घरात घुसून या महिलेस मारहाण करत तिचा विनयभंग केल्याची घटना स्थानिक सिव्हिल लाईन भागात घडली. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, त्यांना अटक केली आहे.

    याबाबत पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीत नमूद आहे की, तिची व नितीन उर्फ बाबू शंकरराव खिरडकर (वय 45 वर्ष रा. दालफैल) याची 2 वर्षांपासून ओळख असल्याने ते दोघे बाहेर दर्शनासाठी तसेच जेवणासाठी जात होते. या दरम्यान निघून गैरफायदा घेत खिरडकर हा पीडित महिलेचे फोटो स्वतःच्या मोबाईलमध्ये काढत होता. असे असताना मागील 3 महिन्यांपासून त्यांच्यात वाद निर्माण झाला असून, खिरडकर हा या महिलेकडे पैशाची मागणी करू लागला. तिने पैसे देण्यास नकार दिला असता त्याने मोबाईलमधील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.

    तसेच त्याने व कुणाल कैलास पालीवाल (वय 24 वर्ष रा. शिवाजीवेस) याने फोन करून अश्लील शिवीगाळ केली. ते दोघे सदर महिलेच्या घरी आले व अश्लील शिवीगाळ करून ‘5 लाख रूपये दे, तुझी सोन्याची पोथ दे, नाहीतर आम्ही तुझे फोटो वायरल करून तुला बदनाम करु’, असे म्हणून निघून गेले.

    त्यानंतर ते पुन्हा पीडित महिलेच्या घरी आले व भाडेकरू याच्या घरात घुसले व त्यांना म्हटले की, ‘हे आमचे घर आहे, खाली करा नाहीतर पैसे द्या नाहीतर तुमचे भांडे घरातून फेकून देतो’. आवाज आल्याने ही महिला खाली येऊन त्यांना समजावत असताना त्या दोघांनी मारहाण करून या महिलेच्या अंगावरील कपडे फाडले व ‘तुझ्या मुलीस पळवून नेऊन ठार मारू’, अशी धमकी दिली. अशा तक्रारीवरून पोलिसांनी नितीन उर्फ बाबू शंकरराव खिरडकर, व कुणाल कैलास पालीवाल या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून उपरोक्त दोघांना अटक केली आहे.