केंद्रातील चुकीच्या धोरणामुळे देशातील लोकशाही धोक्यात ; काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांची टीका

देशात केंद्र सरकारने जीएसटी आणि इतर सरकारी धोरणांचा चुकीचा वापर केल्याने महागाई प्रचंड वाढली आहे. काही यंत्रणांचा गैरवापर होत असून त्यामुळे येथील लोकशाही धोक्यात आल्याची टीका माजी गृहराज्यमंत्री व कॉंग्रेसचे नेते सतेज उर्फ बंटी पाटील यांनी साताऱ्यात केली आहे.

  सातारा : देशात केंद्र सरकारने जीएसटी आणि इतर सरकारी धोरणांचा चुकीचा वापर केल्याने महागाई प्रचंड वाढली आहे. काही यंत्रणांचा गैरवापर होत असून त्यामुळे येथील लोकशाही धोक्यात आल्याची टीका माजी गृहराज्यमंत्री व कॉंग्रेसचे नेते सतेज उर्फ बंटी पाटील यांनी साताऱ्यात केली आहे. महाराष्ट्रात मंत्रीमंडळ स्थापन व्हावे यासाठी आम्हालाच राज्यात मोर्चे काढावे लागतील असा उपरोधिक टोला त्यांनी राज्यातील शिंदे व भाजप युती सरकारला लगाविला .

  सातारा जिल्ह्यात ९ ते १५ ऑगस्ट या दरम्यान कॉंग्रेस ७५ किलोमीटरच्या आझादी गौरव पदयात्रेचे आयोजन केले आहे. त्याची माहिती सतेज पाटील यांनी पत्रकारांना दिली. ते म्हणाले, आझादी गौरव पदयात्रेची सुरवात ९ ऑगस्ट रोजी कोल्हापूर नाका कराड येथून सुरू होणार आहे. माण खटाव कोरेगाव सातारा ग्रामीण व शहर फलटण वाई जावळी, पाटण कराड दक्षिण व कराड उत्तर महाबळेश्वर येथे प्रत्येक तालुक्यात किमान पाच ते पंधरा किलोमीटर पदयात्रा होणार असून या पदयात्रेत जनसंवाद व काँग्रेसने भारतीय स्वातंत्र्य लढयात दिलेले योगदान आणि त्यातील लोकशाहीचा विचार लोकांपर्यंत पोहचविला जाणार आहे . प्रत्येक पदयात्रेसाठी जिल्हा कॉंग्रेस कमिटीने तालुका निहाय निरीक्षक नेमलेला आहे.

  भाजप लोकशाहीचा गळा घोटतोय
  राष्ट्रीय व राज्य पातळीवर घडणाऱ्या घटनांबाबत भाष्य करताना पाटील म्हणाले, केंद्राने जीएसटी कक्षेत जिवनावश्यक वस्तू आणून महागाई वाढविली आहे. यंत्रणांचा चुकीचा वापर यामुळे येथील लोकशाही धोक्यात आली आहे. म्हणूनच कॉंग्रेसची सातत्याने संघटनात्मक पातळीवर सातत्यान आंदोलन सुरू आहेत. भाजप लोकशाहीचा गळा घोटतेय अन आपण लोकशाहीचे प्रबोधन करताय या प्रश्नावर ते म्हणाले आज महागाई अन जी जीएसटी मुळे लोकशाही धोक्यात आली आहे त्यामुळे नैतिक जबाबदारी  म्हणून काँग्रेस त्याविरूध्द व्यापक जनआंदोलन उभे करत  आहे.

   चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याच्या अफवा
  पेट्रोल, डिझेल महागाई या विरुद्ध आंदोलन सुरू आहे. महागाई विरुद्ध आज सरकार बोलायला तयार नाही. राज्यात सरकार स्थापन होऊन ३५ दिवस झाले मात्र अद्याप मंत्रीमंडळ स्थापन झालेले नाही. अशोक चव्हाणांबाबत बोलताना ते म्हणाले, चव्हाण भाजपच्या वाटेवर या चर्चांना काही अर्थ नाही. या अफवा आहेत याबाबत त्यांनी खुलासाही केला आहे. हे सरकार टीकेल की नाही हे येत्या ८ ऑगस्टला कळेल. राज्यात मंत्रीमंडळ स्थापन व्हावे म्हणून आता काँग्रेसला मोर्चे काढावे लागतील. दोघांच्यावर राज्य चालणे हे राज्याच्या हितावह नाही. ११ जणांची एक टीम तरी करा असे आम्ही सांगत आहोत. आता मंत्री कोणाला करायचे हा खरा प्रश्न आहे असे ही त्यांनी नमूद केले.