साताऱ्यात अंगणवाडी सेविकांची निदर्शने! सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी करण्याची मागणी

अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी करण्यात यावी, कोरोना काळातील मानधन देण्यात यावे अशा विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, या आंदोलनात शेकडोच्या संख्येने सेविका आणि मदतनीस सहभागी झाल्या होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सातारा जिल्हा पूर्व प्राथमिक शिक्षिका-सेविका संघाच्यावतीने आंदोलन करण्यात आले.

    सातारा : अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी करण्यात यावी, कोरोना काळातील मानधन देण्यात यावे अशा विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, या आंदोलनात शेकडोच्या संख्येने सेविका आणि मदतनीस सहभागी झाल्या होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सातारा जिल्हा पूर्व प्राथमिक शिक्षिका-सेविका संघाच्यावतीने आंदोलन करण्यात आले.

    आंदोलनात संघटनेचे महासचिव ॲड. शौकत पठाण, राज्याध्यक्षा सुजाता रणनवरे, जिल्हाध्यक्षा अर्चना अहिरेकर, संगीता शिखरे, नुरजँहा सय्यद, निर्मला मोदी, रेखा जाधव, सुरेखा शिंदे, अर्चना आहिरेकर, उषा कुंभार  यांच्यासह संघटक अजय नलावडे, संदीप माने, विठ्ठल सुळे आदींसह शेकडोच्या संख्येत सेविका, मदतनीस सहभागी झाल्या होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच सेविका आणि मदतनीसांनी रस्त्याच्या बाजुला ठिय्या मांडला होता. यावेळी विविध मागण्यांबाबत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. महासचिव ॲड. शौकत पठाण यांनी सेविका आणि मदतनीसांना मार्गदर्शन करत आंदोलनाची भूमिका सांगितली. जिल्हा परिषदेसमोर महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघाच्या नेतृत्वाखाली अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी आंदोलन केले. याठिकाणी स्वतंत्र मंडप टाकून बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. सेविका आणि मदतनीसांनी विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी मागण्यांसाठी घोषणाबाजीही करण्यात आली. आंदोलनात संघटनेच्या जिल्हाध्यक्षा सुरेखा गायकवाड, सरचिटणीस वनिता वाडकर आदींसह सेविका, मदतनीस सहभागी झाल्या होत्या.

    या आहेत प्रलंबित मागण्या
    आहाराचा ८ रुपये दर अत्यल्प असून त्यामुळे कुपोषण निर्मुलन होण्याऐवजी उलट त्यात वाढ होत आहे. सर्वसाधारण बालकांसाठी १६ व अतिकुपोषित बालकांसाठी २४ रुपये दर करावा, अंगणवाडी सेविका व २६ हजार रुपये व मिनी अंगणवाडी मदतनिसांना २० हजार रुपये दरमहा मानधन करण्यात यावे, आदी मागण्यांसाठी सातारा जिल्हा पूर्व प्राथमिक शिक्षिका, सेविका संघाच्यावतीने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयापासून जिल्हा परिषद असा मोर्चा काढण्यात आला.