फळ मार्केटमधील व्यापारी, हमालांना डेंग्यू ; स्वच्छतेचा बोजवारा, व्यापार्‍यांचा सेस न भरण्याचा इशारा

विष्णूआण्णा पाटील फळे व भाजीपाला मार्केटमध्ये अस्वच्छतेचा कळस झाला आहे. स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असून मोठी दुर्गंधी पसरली आहे. तेरा व्यापारी व तीन हमालांना डेंग्यू झाल्याचा दावा व्यापाऱ्यांकडून केला जात आहे.

    सांगली : विष्णूआण्णा पाटील फळे व भाजीपाला मार्केटमध्ये अस्वच्छतेचा कळस झाला आहे. स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असून मोठी दुर्गंधी पसरली आहे. तेरा व्यापारी व तीन हमालांना डेंग्यू झाल्याचा दावा व्यापाऱ्यांकडून केला जात आहे. स्वच्छता न केल्यास सोमवारपासून सेस न भरण्याचा इशारा व्यापारी संघटनेच्यावतीने अध्यक्ष अनिल आलदर आणि समीर बागवान यांनी दिला आहे.

    कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळे व भाजीपाला मार्केटमधील स्वच्छतेचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. व्यापारी-हमालांकडून वारंवार स्वच्छतेबाबत तक्रारी आल्या, परंतू स्वच्छतेचा देखावा केला जातो. काही प्रमाणात कचरा उठाव होतो. हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या दिवस पुढे स्वच्छता नियमित होते. मात्र पुन्हा तेच सुरु होते. संचालक मंडळ कार्यरत असताना व त्यानंतर प्रशासक आल्यानंतरही त्यामध्ये काहीही बदल झालेला नाही. फळे व भाजी पाला मार्केटमध्ये अस्वच्छतेचा कहर झाला आहे.

     स्वच्छतेचा बोजवारा
    स्वच्छतेचा बोजवारा उडाला असून शौचालय सुस्थितीत नसल्याने उघड्यावरच शौचास करण्यात येत आहे. पावसाचे पाणीही साचून राहीले आहे. लाखो रूपये खर्च करून करण्यात आलेले गटारीचे काम वाया गेले. कारण त्यामधून पाण्याचा निचरा होत नाही. बाजार समिती प्रशासनाचे याकडे काहीही लक्ष नाही. व्यापाऱ्यांनी विचारणा केल्यास प्रशासन त्यांना उध्दटपणे उत्तरे दिली जात असल्याची तक्रार आहे. दुर्गंधी व घाणीमुळे व्यापारी-हमाल आजारी पडत आहे. गेल्या काही दिवसांत १३ व्यापारी व तीन हमालांना डेेंग्यूची लागण झाली आहे. बाजार समिती प्रशासनाने यामध्ये तातडीने लक्ष घालून स्वच्छता न केल्यास सोमवारपासून व्यापारी सेस भरणार नसल्याचा इशारा आलदर यांनी दिला.