Breaking : वेळीच लक्षात आलं म्हणून… मोठी दुर्घटना टळली! देवळाली एक्सप्रेस खोळंबली, प्रवासी बोगीच्या बॅटरी बॉक्सला आग; जीवितहानी नाही

नाशिककडे जाणारी देवळाली एक्सप्रेस फलाट क्रमांक २ वर उभी होती. त्याच वेळेस आरएमएस ऑफिस समोरील एका बोगीच्या बॅटरी बॉक्समधून धूर येत असल्याचे ३ नंबर फलाटावरील स्वच्छता ठेकेदार कर्मचारी यांच्या लक्षात आले.

    जळगाव : मध्य रेल्वेच्या (Central Railway) जळगाव जंक्शन स्थानकावर (Jalgaon Junction Station) भुसावळ देवळाली एक्सप्रेस (Bhusawal Deolali Express) बोगीच्या (Bogie) बॅटरी बॉक्सला आग (Battery Box Fire) लागल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. यामुळे देवळाली एक्सप्रेस बराच वेळ जळगाव स्थानकावर खोळंबली होती.

    मध्य रेल्वे मार्गावर नाशिक कडे जाणारी गाडी क्र.11114 भुसावळ देवळालीच्या प्रवासी बोगीतील बॅटरी बॉक्सला आग लागल्याची घटना सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली.

    नाशिककडे जाणारी देवळाली एक्सप्रेस फलाट क्रमांक २ वर उभी होती. त्याच वेळेस आरएमएस ऑफिस समोरील एका बोगीच्या बॅटरी बॉक्समधून धूर येत असल्याचे ३ नंबर फलाटावरील स्वच्छता ठेकेदार कर्मचारी यांच्या लक्षात आले. स्वच्छता कर्मचाऱ्यानी लागलीच आरपीएफ आणि स्टेशन अधीक्षकाना या घटनेची माहिती दिली.

    या बोगीसह आजूबाजूच्या बोगीतील प्रवाशांना उतरविण्यात येऊन बोगी पूर्णपणे रिकामी करण्यात आली. दरम्यान पायलट आणि गार्ड तसेच इतर कर्मचाऱ्यांनी उपलब्ध असलेल्या फायर इंस्टिंग्युशर मधील अग्निप्रतिबंधक रसायनाचा फवारा मारून आग आटोक्यात आणली.

    बॅटरी बॉक्सच्या बाजूला प्लास्टिक वा अन्य कचरा अडकलेला आढळून आला, या कचऱ्यामुळे बॅटरीच्या वायर्सनी पेट घेतला असावा अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.