उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती येथील विकासकामांची पाहणी

सार्वजनिक विकासकामे गुणवत्तापूर्ण व गतीने पूर्ण करण्याचे दिले निर्देश

    बारामती: उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी बारामती परिसरातील जवाहरबाग ते परकाळे बंगला येथील कॅनॉलचे सुशोभिकरण व सेंट्रल पार्क येथील विविध विकास कामांची पाहणी करुन अधिकाऱ्यांना कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

    विकास कामांची पाहणी करतांना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाबाबत माहिती घेतली. सार्वजनिक विकासकामे करतांना ती गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होईल, याकडे लक्ष द्यावे. जवाहरबाग ते परकाळे बंगला येथील कॅनॉल दरम्यान बांधण्यात येणाऱ्या पायऱ्यांवरुन पाण्याचा व्यवस्थितपणे निचरा होईल अशी रचना असावी. परिसरात अधिकाधिक वृक्षारोपण करावे.

    नवीन प्रशासकीय भवन शेजारी उभारण्यात येणाऱ्या सेंट्रल पार्कचे सादरीकरण बघितल्यानंतर श्री. पवार म्हणाले, सेंट्रल पार्क येथे ४० मीटर उंचीचा मनोरा (वॉच टॉवर) उभारण्यात येणार असून यावर चढउतार करतांना नागरिकांच्या सुरक्षितेकडे लक्ष द्यावे. येथील बैठक व्यवस्था, पदपथ, प्रेक्षागृह, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि लहान बालकांसाठी उभारण्यात येणारे पार्क आदी कामे करतांना गर्दीचे योग्यप्रकारे नियोजन करावे, असे निर्देशही पवार दिले.

    यावेळी अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बप्पा बहिर, कार्यकारी अभियंता अनिल ढेपे, महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता सुनिल पावडे, उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, मुख्याधिकारी महेश रोकडे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर, बारामती सहकारी बँकचे संचालक सचिन सातव आदी उपस्थित होते.