मराठा मोर्चावर लाठीचार्जच्या घटनेमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याने सभेला गैरहजर? एकनाथ शिंदे म्हणाले…

जालन्यात मराठा आक्रोश मोर्चावर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जच्या घटनेवर उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बुलढाण्यातील शासन आपल्या दारी कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाही, असं बोललं जात आहे.

    मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी येथे करण्यात येत असलेल्या आंदोलकांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जच्या घटनेच्या निषेधार्थ राज्यभरात संतापाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान जालन्यात मराठा आक्रोश मोर्चावर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जच्या घटनेवर उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बुलढाण्यातील शासन आपल्या दारी कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाही, असं बोललं जात आहे. याबाबत एकनाथ शिंदेंना पत्रकारांनी विचारले असता शिंदेंनी आपली भूमिका स्पष्ट केली.

    काय म्हणाले एकनाथ शिंदे
    एकनाथ शिंदे म्हणाले, “ देवेंद्र फडणवीस लेह लडाखमध्ये लष्कराच्या कार्यक्रमासाठी गेले आहेत. अजित पवारही या कार्यक्रमाला येणार होते, मात्र काल शनिवारी रात्रीपासून त्यांना ताप आहे. त्यांची तब्येत खराब झाल्यामुळे ते या ठिकाणी आले नाहीत. त्यामुळे कुठलाही गैरसमज करून घेऊ नका.मी जाहीर सांगितलं आहे की, आमच्यात कुठलीही फूट पाडण्याचा प्रयत्न केला, दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तरी त्यांना यश मिळणार नाही,” असं मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं.