प्रलंबित पदभरती प्रक्रियेला वेग, उपमुख्यमंत्र्यांकडून महिन्याभरात जाहिरात प्रसिद्ध करण्याचे आश्वासन

अनुसुचित जमातीच्‍या उमेदवारांच्‍या प्रलंबित पदभरतीबाबत सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्‍याने शासनाशी पत्रव्‍यवहार व पाठपुरावा केला आहे. दिनांक १० मार्च २०२२ रोजी सुधीर मुनगंटीवार यांनी या विषयासंदर्भात विधानसभेत अर्धा तास चर्चा उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले होते.

    मुंबई: राज्‍यातील अनुसुचित जमातीची वर्ग १ ते ४ पर्यंतची विशेष पदभरती प्रक्रिया (Recruitment Process) प्रलंबित असल्‍यामुळे बेरोजगार आदिवासी उमेदवारांमध्‍ये असंतोष पसरलेला आहे. ही पदभरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी अशी मागणी वने व सांस्‍कृतीक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी मुख्‍यमंत्री व उपमुख्‍यमंत्री यांच्‍याकडे केलेली आहे. येत्‍या एक महिन्‍यात ही प्रलंबित पदभरती प्रक्रिया पूर्ण करण्‍याच्‍या दृष्‍टीने जाहीरात प्रसिध्‍द करण्‍यात येईल, असे आश्‍वासन उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी दिले आहे.

    अनुसुचित जमातीच्‍या उमेदवारांच्‍या प्रलंबित पदभरतीबाबत सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्‍याने शासनाशी पत्रव्‍यवहार व पाठपुरावा केला आहे. दिनांक १० मार्च २०२२ रोजी सुधीर मुनगंटीवार यांनी या विषयासंदर्भात विधानसभेत अर्धा तास चर्चा उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले होते. अनुसुचित जमातीची वर्ग १ ते ४ पर्यंतची प्रलंबित विशेष पदभरती प्रक्रिया महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगासह इतर प्राधिकरणांनी जाहीराती देवून पूर्ण करण्‍याची आवश्‍यकता आहे. न्‍यायालयीन आदेशाप्रमाणे व दिनांक २१ डिसेंबर २०१९ च्‍या शासन निर्णयानुसार शासकीय तसेच खाजगी अनुदानित संस्‍थातील पदभरती प्रक्रिया पूर्ण करण्‍याची आवश्‍यकता आहे. सर्वोच्‍च न्‍यायालयाने सिव्‍हील अपील क्रमांक ८९२८/२०१५ व इतर याचिकानुसार दिनांक ६ जुलै २०१७ रोजी दिलेल्‍या निर्णयाची राज्‍यात अंमलबजावणी करण्‍याच्‍या दृष्‍टीने सामान्‍य प्रशासन विभागाने दिनांक २१ डिसेंबर २०१९ रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. या शासन निर्णयाची अंमलबजावणी न झाल्‍यामुळे अनुसुचित जमातीतील बेरोजगार उमेदवारांमध्‍ये असंतोष पसरला आहे, त्‍यामुळे ही प्रलंबित पदभरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्‍याची मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत केली होती.

    या चर्चेदरम्‍यान तत्‍कालीन सामान्‍य प्रशासन राज्‍यमंत्र्यांनी कार्यवाहीचे आश्‍वासन देवूनही ही पदभरती प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे. आश्‍वासनपूर्तीसाठी सुधीर मुनगंटीवार यांनी तत्‍कालीन सामान्‍य प्रशासन राज्‍यमंत्र्यांना व तत्‍कालीन मुख्‍यमंत्र्यांना स्‍मरणपत्रे देखील पाठविली, मात्र तत्‍कालीन सरकारने कोणतीही कार्यवाही केलेली नाही.

    नुकत्‍याच झालेल्‍या मंत्रीमंडळाच्‍या बैठकीत सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्‍यमंत्री व उपमुख्‍यमंत्र्यांचे याकडे लक्ष वेधले. उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका महिन्‍यात याबाबत त्‍वरेने जाहीरात प्रसिध्‍द करण्‍यात येईल, असे आश्‍वासन सुधीर मुनगंटीवार यांना दिले आहे.