हौसिंगच्या प्रश्नासंदर्भात लवकरच बैठक घेणार, उपमुख्यमंत्री फडणवीसांचे दरेकरांना आश्वासन

एक अभूतपूर्व कामकाजाची पद्धत देवेंद्र फडणवीसांच्या रूपाने महाराष्ट्र अनुभवत आहे. हौसिंग सेक्टरमधील प्रलंबित प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी एक उच्च स्तरीय बैठक आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी लावावी, अशी विनंती दरेकरांनी केली.

    मुंबई – गृहनिर्माण सोसायट्याबाबत उर्वरित निर्णयांची अंमलबजावणी करण्याकरिता आचारसंहिता लागण्यापूर्वी बैठक लावावी अशी विनंती भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी आज सभागृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनीही दरेकर यांच्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद दिला.

    सभागृहात बोलताना दरेकर म्हणाले की, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काम आहे. अभ्यूदय नगरच्या मैदानावर २५ हजार लोकांनी नोंदणी केली होती. त्या कार्यक्रमात मी मुंबईतल्या हौसिंग सेक्टरच्या समस्या मांडल्या होत्या. अभ्यूदय नगर पुनर्विकासाचा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित असल्याचा भाषणातही उल्लेख केला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यासपीठावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला, मंजुरी घेतली आणि १५ दिवसांत हा विषय मंत्रिमंडळ बैठकीत आणतो म्हणून सांगितले. त्यानुसार तो विषय मंत्रिमंडळ बैठकीत आणून अभ्यूदय नगरचा पुनर्विकास मार्गी लावला.

    एक अभूतपूर्व कामकाजाची पद्धत देवेंद्र फडणवीसांच्या रूपाने महाराष्ट्र अनुभवत आहे. हौसिंग सेक्टरमधील प्रलंबित प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी एक उच्च स्तरीय बैठक आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी लावावी, अशी विनंती दरेकरांनी केली. त्यावर बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, हौसिंग सेक्टरमधील जवळपास १६ मुद्यावर निर्णय केले आहेत. अजून छोटे मोठे मिळून 35 मुद्दे आले आहेत त्याही संदर्भात मी बैठक घेऊन लवकरात लवकर निर्णय घेऊ, असे आश्वस्त केले.