मुख्यमंत्रीपदाबद्दल अजित पवारांनी मांडले स्पष्ट मत; कार्यकर्त्यांना दिल्या सूचना

पुण्यामध्ये अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना सूचना देत निवडणूकांसाठी तयारी लागण्याचे निर्देश दिले.

    पुणे : पुण्यामध्ये अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी पक्षाचा (NCP) मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना सूचना देत निवडणूकांसाठी तयारी लागण्याचे निर्देश दिले. तुम्हाला फोन आले तरी हळवे होऊ नका असा सल्ला देताना शरद पवार (Sharad Pawar) गटाला टोला लगावला. थोडी कळ सोसा, सारखे मुख्यमंत्री, मुख्यमंत्री करु नका. असा सल्ला देखील अजित पवार यांनी पुण्यातील कार्यकर्त्यांना दिला.

    आगामी निवडणूकांसाठी कार्यकर्त्यांना सूचना देताना अजित पवार म्हणाले, “दोन महिन्यांनी लोकसभा निवडणूक येईल. महिन्याभरात आचारसंहिता लागेल. या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार निवडून आले पाहिते. त्यासाठी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता कमी पडता कामा नये. गटातटाचं राजकारण अजिबात करून नका. काम करताना शंभर टक्के आपल्या मनासारखं काम होत नाही. आपण लोकशाहीमध्ये काम करतो. अनेकांचे विचार काय, हे समजून घेतलं पाहिजे. त्यानंतर बहुमताचा आदर करून निर्णय घ्यायचा असतो निवड करताना जातीपातीचं, नात्यांचं राजकारण अजिबात करता कामा नये. निवड करताना सर्व समाज, घटक दिसला पाहिजे. पदाधिकाऱ्यांमध्ये भटके, अल्पसंख्याक असे सगळेच दिसले पाहिजेत,” असा सल्ला अजित पवार यांनी राष्ट्रवादीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला.

    त्याचबरोबर अजित पवार हे मुख्यमंत्री पदासाठी योग्य नेते आहेत अशी भूमिका सातत्याने राष्ट्रवादी कार्यकर्ते मांडत असतात. या कार्यकर्त्यांना सूचना देताना अजित पवार म्हणाले, “बाबांनो जरा कळ सोसा. धीर धरा. तुम्ही सारखे मुख्यमंत्रिपद, मुख्यमंत्रिपद म्हणता. असे करू नका. सर्वप्रथम आपली संघटना मजबूत करू. लोकांपर्यंत संघटना पोहोचवू. लोक आपल्याकडे येत आहेत. लोकांचा आपल्यावर विश्वास वाढत आहे,” अशा शब्दांत अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या महत्त्वकांशेला आवर घातला आहे. त्याचबरोबर अजित पवार यांनी शरद पवार गटाचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला.

    शरद पवार गटाचे नाव न घेता अजित पवार म्हणाले, “आधी पाच, पाच दहा वर्ष फोन केले जात नव्हते. चौकशी केली जात नव्हती. आता फोन केले जात आहे. विचारपूस होत आहे. काय कसे चालले आहे? विचारत आहेत. परंतु कोणाचे फोन आले तरी हळवे होऊ नका. तुमच्या मनाची चलबिचल होऊ देऊ नका. मला फोन करण्यास वेळ नाही. कारण मी फोन केल्यास मला इतर कामे करता येणार नाही. परंतु मी तुम्हाला विकासाचे काम करुन देईल. तुमचे कुठलेही काम किंवा प्रश्न आणला तरी ते पूर्ण होईल. त्याबद्दल तुम्ही काळजी करु नका. आता आपणास आज एका नव्या विचाराने पुढे जायचे आहे. आपल्या पक्षाची फरफटत होऊ नये,” यासाठी ही नवी भूमिका आपण स्वीकारली आहे असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.