सराईत गुन्हेगारांची पोलीस उपायुक्तांनी घेतली शाळा, १४० गुन्हेगारांची हजेरी; कोथरूड पोलीस ठाण्यात आदान-प्रदान कार्यक्रमाचे नियोजन

वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासोबतच गुन्हेगारांवर पोलिसांचा (Police) वचक रहावा यासाठी कोथरूड (Kothrud) पोलीस ठाण्यात झोन तीनमधील सर्वच सराईत गुन्हेगारांची (Crime) शाळा घेण्यात आली. शाळेत तब्बल १४० गुन्हेगारांची माहिती गोळा केली असून, त्यांचे नव्याने ब्राऊझर तयार केले आहे.

    पुणे : वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासोबतच गुन्हेगारांवर पोलिसांचा (Police) वचक रहावा यासाठी कोथरूड (Kothrud) पोलीस ठाण्यात झोन तीनमधील सर्वच सराईत गुन्हेगारांची (Crime) शाळा घेण्यात आली. शाळेत तब्बल १४० गुन्हेगारांची माहिती गोळा केली असून, त्यांचे नव्याने ब्राऊझर तयार केले आहे.

    शहरात कोयतेधारी आणि नव्याने उदयास आलेल्या गुन्हेगारांनी चांगलाच धुडगूस घातला आहे. दोन गटातील वाद तसेच किरकोळ कारणावरून होणाऱ्या हाणामारीच्या घटनांनी सतत शहरात दहशतीचे वातावरण आहे. टोळके कोयते हातात घेऊन दहशत माजवत आहेत. सराईत गुन्हेगार आपल्या भागासोबतच दुसऱ्या ठिकाणी जाऊन देखील गुन्हे करत आहेत. शहरातील या वाढत्या घटनांना आळा घाळण्यासोबतच गुन्हेगारांवर वचक बसविण्यासाठी पोलीस आयुक्त रितेश कुमार व सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शरिराविरूद्ध व मालाविरूद्ध गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्यासोबतच चेकींग करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, त्यांची पुर्ण माहिती गोळा करण्याबाबतही सांगण्यात आले आहे.

    या पार्श्वभूमीवर झोन तीनचे पोलीस उपायुक्त सुहेल शर्मा यांनी झोन तीनमधील सर्वच गुन्हेगार आदान-प्रदान कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कोथरूड पोलीस ठाण्यात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी तब्बल १४० गुन्हेगारांनी हजेरी लावली होती. त्यात स्थानिक पोलिसांचे तपास पथक व अधिकारी देखील उपस्थित होते. यादरम्यान, सर्व गुन्हेगारांची माहिती, त्यांचे सध्याचे फोटो, राहता पत्ता, करत असलेले काम व कोणासोबत फिरततात, मोबाईल क्रमांक याची इंतभूत माहिती घेतली आहे. त्यांचे नवीन ब्राऊझर तयार केले गेले आहे. त्यामुळे झोनमधील सर्वच गुन्हेगारांची माहिती संबंधित पोलीस ठाण्यांकडे असणार आहे. त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवले जाणार असून, या आदान-प्रदान कार्यक्रमामुळे गुन्हेगारांवर देखील पोलिसांचा वचक राहणार आहे.

    हद्दीतील गुन्हेगार, टोळी तसेच अल्पवयीन गुन्हेगारांवर वचक ठेवण्यात येत आहे. आदान-प्रदान कार्यक्रमातून त्यांची पुर्ण माहिती गोळा केली गेली आहे. त्यांच्यावर बारकाईने लक्ष देण्यासोबतच सर्वच पोलीस ठाण्यांना झोनच्या गुन्हेगारांचीही या उपक्रमामुळे माहिती झाली आहे. यापुढेही असे कार्यक्रम प्रत्येक पोलीस ठाण्यात घेतली जातील.

    - सुहेल शर्मा, पोलीस उपायुक्त, झोन तीन.