भोंगे प्रकरण: देशपांडेचा चालक आणि मनसे शाखाध्यक्षाचा जामीनासाठी अर्ज, सत्र न्यायालयात १३ मे रोजी सुनावणी निश्चित

दोघांनीही भोईवाडा दंडाधिकारी न्यायालयात जामीनासाठी दाखल केलेला अर्ज फेटाळून लावण्यात आल्यानंतर दोघांनीही सत्र न्यायालयात धाव घेत जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यावर बुधवारी न्यायाधीश पी. बी. जाधव यांच्यासमोर प्राथमिक सुनावणी पार पडली. तेव्हा, न्यायालयाने मुंबई पोलिसांना अर्जावर उत्तर दाखल करण्याचे निर्देश देत सुनावणी १३ मे रोजी निश्चित केली आहे.

    मुंबई – मशिदींवरील अनधिकृत भोंगे काढण्याबाबत मनसेने आक्रमक भूमिकास्विकारल्यानंतर मनसे नेते यांची मुंबई पोलिसांशी झालेल्या झटापटीत महिला पोलीस जखमी झाल्या. त्याप्रकरणी मनसेचे दादर शाखाध्यक्ष आणि संदीप देशपांडेचा वाहन चालक रोहित वैश्यला अटक करण्यात आली. दोघांनीही मुंबई सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला असून त्यावर १३ मे रोजी सुनावणी निश्चित करण्यात आली आहे.

    राज ठाकरे यांनी मशिदींसमोर हनुमान चालीसा वाजवण्याचे आदेश दिले होते. ४ मेला ठिकठिकाणी मनसैनिकांनी मशिदींसमोर हनुमान चालीसा वाजवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राज्यभरात पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू करून अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना पोलीस ताब्यातघेण्यासाठी गेले होते. पण, संदीप देशपांडे आणि संतोष गाडीतून हे गाडीमधून बसून पळून गेले. गाडी भरधाव वेगात दामटल्यामुळे महिला पोलीस कर्मचाऱ्याला धडक बसली आणि त्या जागेवरच कोसळल्या होत्या. त्यातच देशपांडेंची गाडी चालवणाऱ्या चालकाला आणि मनसेचे शाखाध्यक्ष संतोष साळीला शिवाजी पार्क पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी संदीप देशपांडे यांच्यासह संतोष धुरी, संतोष साळी आणि चालक रोहित वैश्यविरोधात कलम ३०८, ३५३, २७९ आणि ३३६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी साळी आणि वैश्यला या दोघांनाही १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

    दोघांनीही भोईवाडा दंडाधिकारी न्यायालयात जामीनासाठी दाखल केलेला अर्ज फेटाळून लावण्यात आल्यानंतर दोघांनीही सत्र न्यायालयात धाव घेत जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यावर बुधवारी न्यायाधीश पी. बी. जाधव यांच्यासमोर प्राथमिक सुनावणी पार पडली. तेव्हा, न्यायालयाने मुंबई पोलिसांना अर्जावर उत्तर दाखल करण्याचे निर्देश देत सुनावणी १३ मे रोजी निश्चित केली आहे.

    याप्रकरणी संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्यावर अटकेची टांगती तलवार निर्माण झाल्याने दोघांनही सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. मात्र, संबंधित न्यायालयाचे न्यायधीश उपस्थित नसल्यामुळे सुनावणी १७ मे पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. सध्या देशपांडे आणि धुरी भूमीगत असून पोलीस दोघांच्या शोधात आहेत.