प्रेमविवाहाची इच्छा अपूर्णच; ट्रकचालकाचा अपघाती मृत्यू; तरुणी गंभीर जखमी, शिंदवणे घाटात अपघात

  पुणे : प्रेमविवाह करण्यासाठी तरुणीला घेऊन ट्रकचालक पसार झाला. पण, दुर्दैवाने त्याच्यावर काळाने घाला घातल्याची घटना घडली. चालक तरुण पशूखाद्य असलेला ट्रक घेऊन येत असताना लोणी काळभोर परिसरातील शिंदवणे घाटात वळणावर ट्रक उलटल्याने चालक तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या अपघातात तरुणी गंभीर जखमी झाली. त्याच्यासोबत पळून आलेल्या तरुणीच्या डोळ्यासमोर भावी जोडीदाराचा मृत्यू झाल्याने प्रेमविवाह करण्याची तिची इच्छा अपुर्णच राहिली.

  रामेश्वर लक्ष्मण शिंदे (वय २१, रा. शेलू मानवद, ता. परतूड, जि. परभणी) असे मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे. अपघातात २३ वर्षीय तरुणी जखमी झाली असून, ती मूळची सांगली जिल्ह्यातील मिरजची आहे. याप्रकणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

  त्यामुळे त्यांच्या विवाहास विरोध

  मिळालेल्या माहितीनुसार, ट्रकचालक रामेश्वर व तरुणीचे प्रेमसंबंध होते. तरुणी विवाहित होती. तिचे पतीशी पटत नव्हते. त्यामुळे ती माहेरी राहत होती. दोघे आंतरधर्मीय विवाह करणार होते. त्यामुळे त्यांच्या विवाहास विरोध होता. तरुणीचे वडील वाहतूकदार आहेत. शिंदे व तरुणीच्या वडिलांची ओळख होती. तरुणीला घेऊन शिंदे मिरजेतून पसार झाला. ती बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात आली होती.

  पशूखाद्य घेऊन चालला होता ट्रक

  पशूखाद्य असलेला ट्रक घेऊन शिंदे आणि तरुणी लोणी काळभोर परिसरातील शिंदवणे घाटातून रात्री साडेअकराच्या सुमारास निघाले होते. शिंदवणे घाटातून ट्रक उरळी कांचनकडे निघाला होता. घाटातील वळणावर ट्रकचालक शिंदेचे नियंत्रण सुटले आणि ट्रक उलटला. अपघातात ट्रकचालक शिंदे गंभीर जखमी झाला. त्याच्याबरोबर असलेली तरुणी गंभीर जखमी झाली. अपघाताची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख आणि सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच शिंदेचा मृत्यू झाला होता. तरुणीच्या पायाला दुखापत झाली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती उपनिरीक्षक देशमुख यांनी दिली.

  नवले पुलाजवळ सलग दुसऱ्या दिवशी अपघात
  नवले पुल अपघात पाँईट म्हणून ओळखला जात असून, सलग दुसऱ्या दिवशी याठिकाणी अपघात होऊन एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पहिल्या दिवशी झालेल्या अपघातात मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर भरधाव चारचाकीने दिलेल्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाला. या अपघातात मृत्यू झालेल्या पादचाऱ्याची ओळख पटली नाही. अपघातानंतर चालक पसार झाला आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी चालकावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस कर्मचारी श्रीकांत सावंत यांनी याबाबत तक्रार दिली आहे. तर दुसऱ्या अपघातात रस्त्याच्या कडेला थांबलेल्या टेम्पोला (छोटा हत्ती) अज्ञात वाहनाने जोराची धडक देऊन तो टेम्पो पलटी होऊन त्यातील कामगाराचा मृत्यू झाला. हा अपघात पहाटे साडे चारच्या सुमारास घडला आहे. अली मोहम्मद यार मोहम्मद (वय २१) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात मसिहुद्दीन खान (वय ३६) यांनी तक्रार दिली आहे. तक्रारदार ठाणे येथील असून, ते भाडे तत्त्वावर टेम्पो चालवितात. ते भाडे घेऊन आले होते. त्यांच्यासोबत एक कामगार देखील टेम्पोत होता. यादरम्यान, त्यांनी टेम्पो साताऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर थांबविला होता. रस्त्याच्या कडेला टेम्पो उभा केला होता. तेव्हा पाठिमागून भरधाव वेगात आलेल्या वाहनाने त्यांच्या टेम्पोला धडक दिली. यात टेम्पो पलटी झाला व कामगार या टेम्पोखाली दबल्याने त्याचा मृत्यू झाला.