बंदूक शरद पवारांची अन् हल्ला उद्धव ठाकरेंवर; फडणवीसांकडून ठाकरे गटाचा ‘शिल्लक सेना’ म्हणून उल्लेख

महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न चालणार नाही, येथे केवळ भाजप पॅटर्न, मोदी पॅटर्न आणि छत्रपती शिवराय पॅटर्नच चालणार आहे, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी येथे व्यक्त केला. मुलगा एकाला झाला आणि पेढे दुसराच वाटतोय, अशा पद्धतीने काही पक्षांना कर्नाटकात काँग्रेसला मिळालेल्या विजयानंतर आनंद होत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

    पुणे : महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न चालणार नाही, येथे केवळ भाजप पॅटर्न, मोदी पॅटर्न आणि छत्रपती शिवराय पॅटर्नच चालणार आहे, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी येथे व्यक्त केला. मुलगा एकाला झाला आणि पेढे दुसराच वाटतोय, अशा पद्धतीने काही पक्षांना कर्नाटकात काँग्रेसला मिळालेल्या विजयानंतर आनंद होत आहे, अशी टीकाही त्यांनी केली. तसेच यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला.

    भाजपच्या प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीच्या समारोपाच्या सत्रात फडणवीस बोलत होते. त्यांनी भाषणात राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्यावरही जोरदार टीका केली. त्यांनी शरद पवार लिखित ‘लोक माझा सांगाती’ या पुस्तकात उद्धव ठाकरे यांच्याविषयी व्यक्त केलेली मते वाचून दाखविली. ‘जेव्हा उद्धव ठाकरे यांच्यावर आम्ही टीका करत होतो, तेव्हा आम्हालाच महाराष्ट्रद्रोही ठरविले जात होते.

    महाविकास आघाडीची वज्रमुठीचे नेते शरद पवार यांनी या वज्रमुठीचा चेहरा असलेल्या उद्धव ठाकरेंवरच टीका केली. या महाविकास आघाडी सरकारचा विश्वासघात ते विसर्जन असा प्रवास आपण अडीच वर्षात पाहिला आहे. एका मंत्र्यांचा दाऊदशी संबंध होता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अडीच वर्षात केवळ दोनदा मंत्रालयात आले. ते आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची माहिती गावोगावांत जाऊन सांगण्याचे आदेश देत आहे.

    उद्धव ठाकरे यांच्या गटाचा शिल्लक सेना म्हणून उल्लेख करत फडणवीस म्हणाले, ‘शिल्लक सेनेच्या आठ याचिका न्यायालयाने स्विकारल्याच नाही. वाघ हा सर्कसमध्ये ही असतो आणि जंगलातही असतो अशी उपरोधिक टीकाही त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

    महाविकास आघाडीवर टीकास्त्र

    महाविकास आघाडीची संभावना त्यांनी विश्वासघाताचे सरकार अशी केली. महाविकास आघाडीतील एक पक्ष भाकरी फिरवणारा, दुसरा तुकडे मिळवणारा व तिसरा भाकरी हिसकावणारा, अशा शब्दांत त्यांनी खिल्ली उडवली.

    …यासाठी ठाकरेंनी पवारांचा क्लास लावावा

    मीच माझा राजीनामा माझ्या पक्षाकडे देतो. माझा पक्ष माझ्या राजीनाम्यावर आक्रोश तयार करेल. मग माझा पक्षच ठराव करेल. मग मीच राजीनामा मागे घेईन आणि माझ्या जागी परत येईन. शरद पवारांनी ठाकरेंना आपल्या कृतीतून सांगितलं की, राजीनामा देतो म्हणणं आणि राजीनामा देणं यातला फरक काय आहे. टीआरपी कसा खेचावा यासाठी पवारांचा क्लास लावावा, असा सल्लाही फडणवीस यांनी दिला.