भाजप व राष्ट्रवादीच्या ‘या’ पाच आमदारांमुळे गाजली राज्यसभा निवडणूक; फडणवीसांनी केला ‘करेक्ट कार्यक्रम’

राज्यसभेच्या ६ जागांसाठी झालेल्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीला धक्का दिला. सहाव्या जागेसाठी झालेल्या अतितटीच्या लढतीत धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांचा विजय झाला. भाजपमधील मते फुटणार अशी चर्चा असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी 'परफेक्ट प्लानिंग' करीत महाविकास आघाडीचा 'करेक्ट कार्यक्रम' केला.

  पिंपरी : राज्यसभेच्या ६ जागांसाठी झालेल्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीला धक्का दिला. सहाव्या जागेसाठी झालेल्या अतितटीच्या लढतीत धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांचा विजय झाला. भाजपमधील मते फुटणार अशी चर्चा असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ‘परफेक्ट प्लानिंग’ करीत महाविकास आघाडीचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केला.

  राज्यसभेची ही निवडणूक भाजपचे तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन आमदारांमुळे खूप गाजली. यात रुग्णवाहिकेने मतदानासाठी गेलेले आमदार लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक, नॉट रिचेबल असलेले राष्ट्रवादीचे नाराज आमदार अण्णा बनसोडे, दिलीप मोहिते आणि या दोघांच्या संपर्कात असलेले ‘टीम देवेंद्र’मधील भाजपच्या एका आमदाराचा समावेश आहे.

  राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक रुग्णवाहिकेतून मतदान करण्यासाठी आले. गंभीर आजारी असताना देखील पुण्यातून मुंबईला रुग्णवाहिकेने गेलेल्या दोन्ही आमदारांची कर्तव्यतत्परतेची राज्यभरात वाहवा होत आहे. स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही आमदारांच्या लढवय्येपणाचे कौतुक केले. ‘राज्यसभेतील भाजपाचा हा विजय आमचे लढवय्ये आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांना समर्पित करतो’, अशा शब्दांत फडणवीस यांनी कृतज्ञताही व्यक्त केली.

  वास्तविक, जगताप आणि टिळक यांची मते निर्णायक ठरली. त्यामुळे धनंजय महाडिक यांचा विजय सोपा झाला, असे सांगण्यात येते.

  दुसरीकडे, राष्ट्रवादीतील दोन आमदारांबाबत दिवसभर उलटसुलट चर्चा ऐकायला मिळाली. पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अण्णा बनसोडे सुरुवातील नॉट रिचेबल होते. राष्ट्रवादीचे दुसरे आमदार दिलीप मोहिते यांनी तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेला घाम फोडला. अखेर पक्षश्रेष्ठींनी पुढाकार घेत मनधरणी करावी लागली.

  आमदार बनसोडे पक्षावर नाराज?

  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पिंपरी-चिंचवडमधील एकमेव आमदार अण्णा बनसोडे गेल्या काही दिवसांपासून पक्षश्रेष्ठींवर प्रचंड नाराज आहेत. पक्षातील स्थानिक आणि राज्य पातळीवरील निर्णयात सहभागी करुन घेतले जात नाही.

  तसेच, ठेकेदार मारहाण प्रकरणात मुलावरील पोलीस कारवाई होत असताना पक्षाची सत्ता असताना मदत झाली नाही, अशी खंत बनसोडे यांना कायम सतावत आहे. दुसरीकडे, स्थानिक पातळीवर २०२४ मध्ये होणारी पिंपरी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून भाजपातील नाराजांना पायघड्या घातल्या जात आहेत. स्थानिक पदाधिकारी बनसोडे यांचे नेतृत्त्व संकूचित करीत असताना त्यांना थेट पक्षश्रेष्ठींकडून ताकद दिली जात आहे. परिणामी, बनसोडे पक्षावर कमालीचे नाराज आहेत. मात्र, पक्षश्रेष्ठींनी मनधरणी केल्यानंतर राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी विधान भवनात पोहोचल्याचे बोलले जाते.

  आमदार दिलीप मोहिते शिवसेनेवर नाराज

  शिरुर लोकसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष शिगेला पोहोचला आहे. खेड पंचायत समिती निवडणुकीत प्रकरण गोळीबारापर्यंत पोहोचले होते. राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते आणि शिवसेनेतील पक्षश्रेष्ठी यांच्या अनेकदा वाक् युद्ध रंगले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करणार नाही, अशी भूमिका मोहिते यांनी घेतल्याचे बोलले जाते.

  यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनधरणी केल्यानंतर मोहिते मतदानासाठी विधानभवनामध्ये दाखल झाले. खेडसह शिरुरमधील स्थानिक राजकारणामुळे मोहिते प्रचंड नाराज असल्याचे बोलले जाते. अजित पवार यांचे जाहीरपणे कौतूक करणारे मोहीते यांच्या नाराजीमागे नेमके कारण काय असावे? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

  ‘टीम देवेंद्र’मधील आमदार राष्ट्रवादीच्या नाराजांच्या संपर्कादरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे आणि दिलीप मोहीते यांच्या संपर्कात भाजपचे एक आमदार होते. त्यांनी बनसोडे आणि मोहीते यांची मते भाजप उमेदवाराला वळवण्यासाठी प्रयत्न केल्याचे बोलले जाते. दोन्ही आमदारांच्या नाराजीचा फायदा भाजपाने उठवण्याचा प्रयत्न केला. या मोहीमेची जबाबदारी ‘टीम देवेंद्र’मधील एका आमदाराने घेतली होती.

  संबंधित आमदार कोण आहेत? याबाबत चर्चेला उधाण आले आहे. तसेच, पक्षश्रेष्ठींनी मनधरणी केल्यानंतर विधानभवनात येऊन मतदान करणाऱ्या राष्ट्रवादीच्या आमदारांचे बंड सध्या थंडावले असले तरी, विधान परिषद निवडणूक आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्याचा फटका राष्ट्रवादीला निश्चितपणे बसु शकतो.