अंबादास दानवेंच्या भाजप प्रवेशावर फडणवीस यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “ऑपरेशन केल्यानंतर…”

भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आले. यावर देवेंद्र फडणवीस यांनी अंबादास दानवे यांच्या पक्षप्रवेशावर प्रतिक्रिया दिली.

    मुंबई : लोकसभा निवडणूक जवळ आल्यामुळे अनेक राजकीय समीकरणे बदलत आहेत तसेच पक्षप्रवेश देखील वाढत आहेत. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा भाजपामध्ये प्रवेश होणार असल्याची जोरदार चर्चा आज सकाळपासून सुरू होती. खुद्द अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेऊन या चर्चांना पूर्णविराम लावला आहे. याबाबत आता भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आले. यावर देवेंद्र फडणवीस यांनी अंबादास दानवे यांच्या पक्षप्रवेशावर प्रतिक्रिया दिली.

    काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

    मराठवाड्यातील एक प्रमुख नेत्याचा भाजपामध्ये प्रवेश होणार होता? याबद्दल फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “मराठवाड्यातील नेत्या डॉ. अर्चना पाटील यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला आहे. राहिल प्रश्न अंबादास दानवेंचा तर आम्ही जेव्हा ऑपरेशन करतो, तेव्हा माध्यमांना कळतच नाही आणि जेव्हा माध्यमांना कळलेलं असतं तेव्हा ऑपरेशन होत नाही.” पुढे माहिती देताना फडणवीस म्हणाले की, अंबादास दानवेंशी आमचा कुठलाही संपर्क नाही. त्यांच्या प्रवेशाची आमच्याकडे तरी कुठलीही चर्चा नाही.

    डॉ. अर्चना पाटील चाकुरकर भाजपमध्ये

    काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय नेते शिवाजीराव पाटील चाकूरकर यांच्या स्नुषा डॉ. अर्चना पाटील चाकुरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईच्या भाजपा कार्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.