“देवेंद्र फडणवीस हे मदारी…, डमरु वाजवून दोन माकडे नाचवताहेत”; संजय राऊतांची बोचरी टीका

छत्रपती संभाजीनगर, नांदेड, नागपूरसारख्या शहरांत गेल्या तीन दिवसांत सरकारी रुग्णालयांत 150 हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला. याची जबाबदारी कोण घेणार, पण मी म्हणतो याला जबाबदार हे घटनाबाह्य सरकार असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला.

    मुंबई – ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी आज रोजच्याप्रमाणे माध्यमांशी संवाद साधताना, शिंदे-फडणवीस व अमित शहांवर जोरदार टीका केली. सध्या राज्यात काय सुरु आहे, समजत नाही, घोटाळा, भ्रष्टाचार यांना वाचवण्यात सरकार मग्न आहे. तसेच राजधानी दिल्लीतून सरकारची सुत्रं हालवली जातहेत, असा आरोप राऊतांनी केला. देवेंद्र फडणवीस हे मदारी आहेत. ते डमरू वाजवतात आणि हे दोन माकडे नाचतात. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या हातात काही नाही. असं संजय राऊत म्हणाले. (devendra fadnavis is madari two monkeys dance with damaru sanjay raut criticism)

    तपास यंत्रणांना घाबरुन शिंदे गेले

    दरम्यान, पुढे बोलताना राऊत म्हणाले की, अमित शहांची शिवसेना फोडण्याची हिंमत नाही. ईडी, सीबीआयनेच शिवसेना फोडली आहे. शिंदे-फडणवीसांना सतत दिल्लीला जावे लागते. त्यामुळं सरकारच्या हातात काही नाही. सगळे काही दिल्लीतून निर्णय घेतले जाताहेत. इडी, इनकम टॅक्सला घाबरुन ते पळून गेले आहेत. तसेच शहांनी शिवसेना फोडली नाही, तर तपास यंत्रणांनी शिवसेना फोडली असा घणाघात राऊतांनी केला.

    भाजपाची कृती रावणासारखी…

    अयोध्येत रामाचं मंदिर जनता बनवत आहे. राम मंदिर बनवल्याने कोणी राम बनत नाही. भाजपची कृती रावणासारखी आहे. महाराष्ट्रात आणि देशात भाजप रावणासारखं वागत आहे, तसेच शिंदेंची शिवसेना म्हणजे चायना माल. त्यांची शिवसेना मेड इन चायना आहे. कारण त्यांचे सरकारच दिल्लीने बनवले आहे. छत्रपती संभाजीनगर, नांदेड, नागपूरसारख्या शहरांत गेल्या तीन दिवसांत सरकारी रुग्णालयांत 150 हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला. याची जबाबदारी कोण घेणार, पण मी म्हणतो याला जबाबदार हे घटनाबाह्य सरकार असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला.