devendra fadnavis and dhananjay munde meeting

धनंजय मुंडे (Dhananjay Munde) रुग्णालयात असताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट होऊ शकली नव्हती म्हणून धनंजय मुंडे यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर आज देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

    मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या कारला परळीमध्ये काही दिवसांपूर्वी रात्री अपघात झाला. या अपघातामध्ये मुंडे यांच्या छातीला आणि डोक्याला मार लागला. त्यांच्या कारचंही नुकसान झालं. धनंजय मुंडे यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार करण्यात आले. अनेक राजकीय नेते त्यांना भेटून त्यांची विचारपूस करत आहेत. आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis And Dhananjay Munde Meeting) धनंजय मुंडे यांच्या भेटीला गेले आहेत. पंकजा मुंडे (Pankaja Munde) या बीडमध्ये नाराज असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या भेटीला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.

    धनंजय मुंडे रुग्णालयात असताना देवेंद्र फडणवीस यांची भेट होऊ शकली नव्हती म्हणून धनंजय मुंडे यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर आज देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना भेटून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे.

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि पंकजा मुंडे यांनीदेखील धनंजय मुंडे यांची काही दिवसांपूर्वी भेट घेतली. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंंडे यांच्या भेटीनंतर बहिण -भावाच्या भेटीवर अनेक चर्चा रंगू लागल्या. दोघांचे राजकीय मतभेद जग जाहीर असताना भेटीचे फोटो समोर आले होते. पंकजा मुंडे आणि धनजंय मुंडे यांच्यातील राजकीय वैर सर्वांनाच माहिती आहे. अनेकदा ते सार्वजनिक मंचावरुन एकमेकांवर टीका करताना दिसतात. मात्र गरज पडेल तेव्हा ते नेहमी एकमेकांच्या पाठीशीही उभे असल्याचे अनेकदा पाहायला मिळाले आहे. यावेळीही राजकीय वैर विसरुन पंकजा मुंडे यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात बंधू धनंजय मुंडे यांची भेट घेतली होती. तर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची चौकशी करताना दिसून आले आहेत.

    दरम्यान, बाहेरच्या लोकांनी आता बीड जिल्ह्यात हस्तक्षेप करू नये, आमच्या जिल्ह्यातील सुखाचा संसार आम्हाला सांभाळू द्या, असं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या. तर, पंकजा मुंडेंना जबाबदारी देण्यासंदर्भात केंद्रीय नेतृत्वाकडे शिफारस करणार आहे तसंच राज्यातील पक्ष श्रेष्ठींना कार्यकर्त्यांच्या भावना सांगणार असल्याची प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.