डबल इंजिन सरकार बनले नसते तर समृद्धी महामार्ग वेगाने पूर्ण झाला नसता: देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस म्हणाले, या प्रकल्पाची किंमत ५० हजार कोटी रुपये असली तरी येत्या दोन वर्षांत आम्ही ही किंमत या महामार्गाच्या माध्यमातून परत मिळवू. या महामार्गाच्या आजुबाजूला इंडस्ट्री कॅरीडोर, डाटा सेंटर, सोलर एनर्जी प्रकल्प, अशी इकोसिस्टीम तयार केली जात आहे.

    नवी दिल्ली – राज्यात सरकार बदलून डबल इंजिन सरकार आले नसते तर समृद्धी महामार्ग वेगाने पूर्ण झाला नसता, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीवर निशाणा साधला.

    समृद्धी महामार्ग तसेच नागपूर एम्स रुग्णालयाचे लोकार्पण झाल्यानंतर आयोजित कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले, अडीच वर्षांपूर्वी समृद्धी महामार्गाचे काम संथ गतीने सुरू होते. या महामार्गाबाबत केंद्र सरकारने काही शंका उपस्थित केल्या होत्या. त्याच्या परिपूर्ततेकडे लक्ष दिले गेले नाही. मात्र, सरकार बदलताच आ्ही याकडे लक्ष देत केंद्र सरकारला पुन्हा प्रस्ताव पाठवला. त्यानंतर केंद्र सरकारने अवघ्या ३५ दिवसांत समृद्धी महामार्गाला मंजूर दिली.

    देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी २० वर्षांपूर्वी समृद्धी महामार्गाचे स्वप्न पाहीले. मात्र, हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ताकद दिली नसती तर हे स्वप्न स्वप्नच राहिले असते. फार कमी जणांनी माझ्या या स्वप्नावर विश्वास ठेवला होता. त्या मोजक्या जणांमध्ये एकनाथ शिंदे हे होते. समृद्धी महामार्गाचा प्रकल्प राज्याने हाती घेतल्यानंतर पहिल्या दिवसापासून एकनाथ शिंदे रस्त्यावर उतरले. त्यांच्याच पक्षाच्या नेत्याने या महामार्गासाठी भूमिअधिग्रहणाला विरोध केला. मात्र, एकनाथ शिंदे यांनी गावपातळीवर जात शेतकऱ्यांची समजूत घालत त्यांनी भूमिअधिग्रहणासाठी तयार केले.

    देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवलेल्या धडाक्यामुळे केवळ ९ महिन्यांत सरकारने भूमीअधिग्रहण पूर्ण केले. एका जणानेही अधिग्रहणाविरोधात कायदेशीर तक्रार केली नाही. समृद्धी प्रकल्पासाठी पूर्वी बँकाही कर्ज देण्यास तयार नव्हत्या. मात्र, अधिग्रहण पूर्ण होताच एसबीआय बँकेने आम्हाला प्रथम ८ हजार कोटींचे कर्ज मंजूर केले. त्यानंतर निधी मिळत गेला आणि आम्ही तब्बल ५० हजार कोटींचा हा प्रकल्प वेगाने पूर्ण केला.

    देवेंद्र फडणवीस म्हणाले, या प्रकल्पाची किंमत ५० हजार कोटी रुपये असली तरी येत्या दोन वर्षांत आम्ही ही किंमत या महामार्गाच्या माध्यमातून परत मिळवू. या महामार्गाच्या आजुबाजूला इंडस्ट्री कॅरीडोर, डाटा सेंटर, सोलर एनर्जी प्रकल्प, अशी इकोसिस्टीम तयार केली जात आहे.

    देवेंद्र फडणवीस म्हणाले, नागपूरमध्ये आता रेल-रोड कनेक्टिव्हिटी खूप सुधारली आहे. मात्र, पुढच्याच वर्षी आम्ही नागपूरमध्ये एअरपोर्टच्या भूमिपुजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलावत आहोत. तसेच, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झाले, ही आमच्यासाठी अतिशय आनंदाची बाब आहे.