शनिशिंगणापूरला चौथऱ्यावरून तैलाभिषेकाची भाविकांना संधी; पण…

श्री क्षेत्र शनीशिंगणापूरला (Shani Shingnapur) राज्यासह देशभरातून व परदेशातूनही भाविक शनिदेवाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते. वर्षभर भाविकभक्तांचा मोठा ओघ शनिशिंगणापुरला असतो.

  सोनई / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : श्री क्षेत्र शनीशिंगणापूरला (Shani Shingnapur) राज्यासह देशभरातून व परदेशातूनही भाविक शनिदेवाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते. वर्षभर भाविकभक्तांचा मोठा ओघ शनिशिंगणापुरला असतो.

  चौथऱ्यावर गर्दी होत असल्यामुळे चौथऱ्यावरील दर्शन बंद केले होते. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून शनीभाविकांची चौथऱ्यावर जाऊन तेल अभिषेक करता यावा, अशी मागणी होती. यामागणीनुसार, श्री शनैश्वर देवस्थान विश्वस्तानी विश्वस्त मंडळाच्या बैठकीत शनी चौथऱ्यावर जाऊन तेल अभिषेक करण्यासाठी शनिवारपासून परवानगी दिली आहे.

  ज्या भाविकांना शनीदेवास तैलाभिषेक करावयाचा असेल, अशा भाविकांना श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टची 500 रुपयांची देणगी पावती घेऊन शनी चौथऱ्यावर अभिषेक करता येईल.

  हा तैलाभिषेक पावतीकरता भाविकांनी देवस्थानचे तेल विक्री काउंटर, देणगी काउंटर तसेच जनसंपर्क कार्यालय या ठिकाणी संपर्क साधावा, असे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर यांनी केले आहे.

  शनिवारी घेतला 900 भाविकांनी लाभ

  स:शुल्क तैलाभिषेकाच्या निर्णयाचे भाविकांनी स्वागत केले असुन पहिल्याच शनिवारी 900 भाविकांनी याचा लाभ घेतला. यामुळे साडेचार लाख रूपयांची देणगी देवस्थानच्या तिजोरीत जमा झाली.

  चौथऱ्यावरील गर्दी कमी होऊन भाविकांच्या इच्छापुर्तीबरोबर मिळालेल्या देणगीतुन देवस्थानच्या तिजोरीतील रक्कमेत भर पडणार आहे.

  राज्यासह, देशभरातील अनेक देवस्थानामध्ये भाविकांची गैरसोय लक्षात घेऊन पेड पासेस दर्शनासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याच धर्तीवर शनी भक्तांच्या मागणीचा विचार करून शनी शिंगणापूर देवस्थान ट्रस्टने निर्णय घेतला आहे.

  शनैश्वर देवस्थानचा स:शुल्क दर्शनाचा निर्णय चुकीचा असुन यामुळे गरीब भाविकावर अन्याय करणारा आहे. निर्णय भेदभाव करणारा नसावा. निर्णय मागे न घेतल्यास निर्णयावर आवाज उठवावा लागेल.

  तृप्ती देसाई, सामाजिक कार्यकर्त्या.