Sanjivan Samadhi Ceremony
Sanjivan Samadhi Ceremony

  पिंपरी : ‘ज्ञानाचा सागर, सखा माझा ज्ञानेश्वर’ या भावनेने राज्यभरातून आलेल्या लाखो भाविकांमुळे अलंकापुरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे. शुक्रवारी (8 डिसेंबर) रात्रीपासूनच भाविकांची गर्दी वाढू लागल्यामुळे दर्शनमंडपातून येणारी दर्शनाची रांग पूजेसाठी बंद ठेवण्यात आली होती. भाविकांचा ज्ञानोबा-तुकारामाचा जयघोष आणि टाळ-मृदंगाच्या आवाजाने आळंदी दुमदुमून निघाली होती. मध्यरात्रीच्या सुमारास स्वकाम सेवा मंडळाच्या सभासदांनी संपूर्ण देऊळवाडा धुवून स्वच्छ केला. घंटानाद झाल्यानंतर साडेबारा ते दीडपर्यंत संजीवन समाधीवर 11 ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चारात पवमान विधिवत अभिषेक करण्यात आला.
  माऊलींच्या समाधीवर चांदीचा मुखवटा
  सनई चौघड्यांच्या मंगल स्वराने मंदिरातील वातावरण अधिक भक्तिमय झाले होते. मुख्य गाभारा आणि देऊळवाडा आकर्षक फुलांच्या सजावटीने दरवळला होता. माऊलींच्या समाधीवर चांदीचा मुखवटा ठेवून पंचामृत अभिषेक करण्यात आला. त्यासाठी दूध, दही, तूप, मध, साखर, आम्रखंड, सुगंधी तेल, उटणे, अत्तर यांचा वापर करण्यात आला. केशरी मेखला, शाल, तुळशीचा हार आणि डोईवर सोनेरीमुकुट ठेवून समाधीला आकर्षक रूप देण्यात आले.
  कार्तिकी एकादशीनिमित्त लाखो भाविक समाधी दर्शनाकरिता
  आज (दि .9) कार्तिकी एकादशीनिमित्त लाखो भाविक संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दर्शनाकरिता आळंदीमध्ये दाखल झाले आहेत. नदीपलीकडील वैतागेश्वर लगत असणारा दर्शन मंडप वारकरी भाविकांनी पूर्ण भरून दत्त आश्रमलगत दर्शनरांग गेल्याचे सकाळी दिसून आले होते.
  ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषात दिंड्यानगर प्रदक्षिणा पूर्ण
  इंद्रायणी घाटावरती स्नानाकरिता प्रचंड गर्दी वारकरी भाविकांनी केली होती. खांद्यावर पताका, डोईवर तुळशी वृंदावन, मृदंगाचा लयबद्धताल, टाळांचा नाद, फुगडी व नृत्यात रममाण झाले होते. अनेक संत महात्मे व देवतांच्या पालख्या घेऊन, ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषात दिंड्यानगर प्रदक्षिणा पूर्ण करीत होत्या. सर्वत्र शहरात ज्ञानोबा माऊलीचा , हरिनामाचा जयघोष ऐकू येत होता.
  यावेळी मान्यवरांची उपस्थिती
  यावेळी व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, बाळासाहेब चोपदार, रामभाऊ चोपदार, माऊलींचे मानकरी योगीराज कुऱ्हाडे, राहुल चिताळकर, स्वप्नील कुऱ्हाडे, योगेश आरु, उपायुक्त संदीप डोईफोडे, आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, चैतन्यमहाराज लोंढे, डी. डी. भोसले पाटील, सचिन गिलबिले, सागर भोसले, संजय महाराज घुंडरे, साहेबराव कुऱ्हाडे, प्रदिप बवले तसंचप्रशासकीय अधिकारी, आळंदीकर ग्रामस्थ बहुसंख्येनं उपस्थित होते.
  मोठा पोलीस बंदोबस्त …
  कार्तिकी यात्रेनिमित्त पिंपरी-चिंचवड पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. वाहतूक नियमन करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी काम केले. याचसोबत वॉर्डन, सामाजिक कार्यकर्ते झटत होते. आळंदी नगरपरिषदेची यंत्रणाही कार्यरत होती.