पंढरपूरजवळ भाविकांवर काळाचा घाला, भीषण अपघातात एकजण ठार तर 19 जण जखमी

पंढरपूरकडे निघालेले भाविकांच्या वाहनास अपघात झाला असून, या अपघातात 19 भाविक जखमी झाले आहेत, तर एका भाविकांचा मृत्यू झाला आहे.

    पंढरपूर : पंढरपूरकडे निघालेले भाविकांच्या वाहनास अपघात झाला असून, या अपघातात 19 भाविक जखमी झाले आहेत, तर एका भाविकांचा मृत्यू झाला आहे. एक खासगी पिकप वाहन घेऊन परभणी जिल्ह्यातील बाला तालुक्यातून भाविक देवदर्शनाची निघालेले होते. या भाविकांनी अक्कलकोट येथे जाऊन स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यानंतर पिकपमधून हे सर्व भाविक विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूरकडे निघाले होते. पंढरपूरच्या जवळ आलेले असतानाच आणि पंढरपूरला पोहोचण्यास केवळ दहा ते बारा किलोमीटर अंतर उरले असताना, तुंगत गावाजवळ त्यांचे पिकअप वाहन उलटले.

    वेगातील वाहन उलटल्याने गाडीतील भाविकांची तारांबळ उडाली. या वाहनातून एकूण 20 जण प्रवास करीत होते. सदर अपघातात 19 भाविक जखमी झाले असून, या जखमींना पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात चिमाजी टेंभुले या 45 वर्षे वयाच्या भाविकाचा मात्र मृत्यू झाला आहे. अपघात होताच आजूबाजूचे नागरिक धावून गेले, आणि जखमींना मदत केली. काही वेळेत पोलीस देखील या ठिकाणी पोहोचले. अपघातात जखमी झालेले भाविक घाबरून गेलेले दिसत होते.

    भाविकांच्या वाहनाला अपघात होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. भाविक खाजगी वाहने घेऊन आणि वाहनात क्षमतेपेक्षा अधिक भाविक बसवून दर्शनाचा प्रवास सुरू असतो. दूर अंतरावरून सलग प्रवास केला जात असतो. त्यामुळे चालकाचे वाहनावर नियंत्रण राहत नाही, आणि अशा प्रकारचे अपघात होत असतात. जखमी झालेल्या 19 भाविकांपैकी बहुतेक भाविकांची प्रकृती ठीक असल्याची माहिती मिळत आहे.