डिसेंबर अखेपर्यंत धनगर समाजाला एसटीचा दाखला मिळेल,  आमदार गोपीचंद पडळकर यांचा विश्वास

धनगर जागर यात्रेचे इंदापुरात आगमन

    इंदापूर :  धनगर आरक्षणासंदर्भातील हायकोर्टात सुरू असलेल्या केस बाबतीत मी सातत्याने पाठपुरावा करत आहे. या केस संदर्भात अपेक्षित होते त्याप्रमाणे राज्य सरकारने तीन शपथपत्रांवरती हायकोर्टामध्ये ठामपणे बाजू मांडली आहे.केसची अंतिम सुनावणी दि. ८, ११ व १५ डिसेंबर रोजी होणार आहे. या तीन दिवसांमध्ये संपूर्ण विषय संपेल. गेल्या ७० वर्षाच्या अन्यायाला वाचा फुटेल. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या पोरांच्या हातामध्ये एसटीचा दाखला मिळेल, अशी खात्री असल्याचे आ. गोपीचंद पडळकर यांनी म्हंटले आहे. सोमवार(दि. १६) रोजी इंदापूर नगरपरिषद मैदान येथे धनगर जागर यात्रेच्या निमित्ताने आयोजित मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते.
    न्यायालयात खटला लढणे प्लॅन ए आहे. महाराष्ट्रातील धनगराची एकजूट होणे आणि राज्य सरकारला ताकद दाखवणे हा प्लॅन बी आहे. म्हणून धनगर जागर यात्रेचे आयोजन संपूर्ण राज्यभर केले आहे.मी धनगर जागर यात्रा सुरू केली तेव्हा लांडग्यांची सर्व पिल्ले कामाला लागली. सर्वत्र विष पेरायला लागली. जेव्हा-जेव्हा महाराष्ट्रातील धनगर एकत्र येतो तेव्हा प्रस्थापितांची झोप उडते.त ्यामुळे संघटित होऊन निर्भीडपणे प्रस्थापितांच्या विरोधात लढणे हा एकमेव पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले.

    गुलाम करण्यासाठी रचना
    एस म्हणजे साहेब, टी म्हणजे ताई आणि डी म्हणजे दादा असा एस. टी. डी. चा अर्थ आहे. एसटीडीच्या गुलामगिरीतून बाहेर पडा एक दिवस तुम्ही राजा व्हाल. साहेब, ताई, दादा म्हणायचं सोडून द्या. इंग्रजांच्या काळात गुलाम करण्यासाठी त्यांनी जी रचना केली होती तशीच रचना एसटीडीची आहे.

    पवारांवर केली टीका
    फोडाफोडी मध्ये माहीर असलेल्या पवारांनी महाराष्ट्रातील एक घर फोडलं नाही तर पहिल्यांदा त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष फोडला. रिपाइंचे तुकडे तुकडे केले. यामध्ये पवारांचा मोठा वाटा आहे. ज्यांनी बाबासाहेबांची चळवळ फोडली, त्यांना बी. के कोकरे आणि धनगरांची चळवळ फोडायला जास्त वेळ लागला नाही. त्यांनी आपल्यातीलच काही लोक पुढे करून ही चळवळ संपवली, असे म्हणत आ. पडळकर यांनी पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

    फक्त आरक्षण नाही तर जमिनी लाटल्या
    धनगरांचे आरक्षण फक्त लाटलं नाही तर धनगरांच्या जमिनी, रामोशी समाजाची वतने, महार वतनाच्या जमिनी मोठ्या प्रमाणात पुणे जिल्ह्यामध्ये प्रस्थापितांच्या जवळच्या लोकांनी लाटल्या आहेत म्हणून ही फक्त धनगर आरक्षणाची लढाई नाही तर लाटलेल्या जमिनी आम्हाला परत काढून घ्यायच्या आहेत. त्याच्यासाठी आपल्याला ताकतीने उभे राहावे लागेल.असे आ. पडळकर यांनी याप्रसंगी बोलताना म्हंटले आहे.