विकासाच्या प्रतिक्षेत धामणी खोऱ्यातील धनगरवाडे! पाचवीला पुजलेली पायपीट, भौतिक सुविधा लोकांपर्यंत पोहोचल्याच नाहीत

एकीकडे देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना दुसरीकडे धामणी खोऱ्यातील काही धनगरवाडे विकासाच्या प्रतिक्षेत आहेत. शिक्षण, आरोग्य, पाणी, वीज, रस्ते यासारख्या भौतिक सुविधा प्रभावीपणे या लोकांपर्यंत पोहोचलेल्या  नाहीत. रात्री अपरात्री एखादी घटना घडल्यास नेटवर्क नसल्याने संपर्क साधणे अडचणीची होते आहे.

  गगनबावडा : एकीकडे देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना दुसरीकडे धामणी खोऱ्यातील काही धनगरवाडे विकासाच्या प्रतिक्षेत आहेत. शिक्षण, आरोग्य, पाणी, वीज, रस्ते यासारख्या भौतिक सुविधा प्रभावीपणे या लोकांपर्यंत पोहोचलेल्या  नाहीत. रात्री अपरात्री एखादी घटना घडल्यास नेटवर्क नसल्याने संपर्क साधणे अडचणीची होते आहे. रस्त्याअभावी अनेक  व्यक्तींना वेळेत उपचार न मिळाल्याने स्वतःचे जीव गमवावे लागले आहेत.

  काही धनगरवाड्यांमध्ये अद्यापही वीज पोहचलेली नाही. वाड्या वस्त्यांमध्ये शाळा जाऊन पोचल्या खऱ्या पण शिक्षणाची अंमलबजावणी प्रभावीपणे झालेली नाही. पिण्याच्या पाण्यासाठी जंगलातील झऱ्यांचा आधार घ्यावा लागत आहे. गगनबावडा तालुक्यातील काही धनगर वाड्यावर रस्ते, वीज पोहोचलेले नाहीत. पर्यायाने हे धनगर बांधव आपली जन्मभूमी सोडून उदरनिर्वाहासाठी शहराकडे स्थायिक झाले आहेत. रस्त्यांसाठी निधी मंजूर होतो पण वन विभागाची परवानगी मिळत नाही. घरकुल मंजूर होते पण बांधण्यासाठी लागणारे साहित्य रस्त्या अभावी वाड्यावर घेऊन जाऊ शकत नाही. या सर्व संकटांचा सामना करता करता जीव मेटाकुटीला येतो.

  धनगर समाज विकासापासून वंचित
  देशाचे पंतप्रधान एकीकडे विकसाचे व्हिजन घेऊन संपूर्ण जगभर फिरत आहेत. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक व्हिडीओ क्लिप व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओमध्ये ते म्हटलेले आहे २०२२ ला देशाचा ७५ वा स्वातंत्र्य दिन साजरा होत आहे. यावेळी २०२२ पर्यंत देशातील एकही कच्चे घर राहणार नाही. तर त्या घरामध्ये वीज, नळ, पाणी, गॅस व शौचालय या सर्व सोयी मिळून पक्के घर बांधून देण्यात येईल. पंतप्रधान आवास योजने अंतर्गत यातील अनेक धनगर वाड्यावर काहीच झालेले नाही म्हणून सर्वसामान्य धनगर समाज विकासापासून वंचित राहिला आहे.

  मग प्रश्न निर्माण होतो स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात देखील आमची वाट बिकटच का? लोकप्रतिनिधी, स्थानिक पुढाऱ्यांनी यामध्ये याकडे विशेष लक्ष देऊन उपेक्षित धनगरवाडे विकासाच्या वाटेवर घेऊन जावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.

  मला दोन वर्षांपूर्वी घरकुल योजनेतून घर मंजूर झाले होते . या घरासाठी लागणारे बांधकाम साहित्य 'कावळटेक धनगरवाड्यावर घेऊन जाणे अशक्य होते. बरेच प्रयत्न केले. वरती वाहन जात नसल्याने चिरे, वाळू, सळी वरती नेणे अत्यंत अवघड होते. अखेर मी घर बांधू शकलो नाही त्यामूळे घरकुल मागे गेले.

  - बंडू शेळके, स्थानिक

  धामणी खोऱ्यातील वाड्यावरील धनगर बांधवांना भौतिक सुविधा उपलब्ध नसल्यामुळे हे लोक उदरनिर्वाहासाठी शहराकडे स्थायिक झाले आहेत. या लोकांना रस्ते, पाणी, वीज ,शिक्षण, आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्यास ओस पडलेले धनगरवाडे पुन्हा गजबजतील. लोकप्रतिनिधी, प्रशासनाने याकडे विशेष लक्ष द्यावे.

  -पांडुरंग शंकर पाटील, सामाजिक कार्यकर्ते